आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा मोदींचा डाव : तांबे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-  केंद्रात सत्तांतर झाले तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने हुकूमशाही पद्धतीने कारभार चालवला आहे. संविधानाचा अवमान करत देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांसारख्या स्वायत्त संस्था मोडीत काढण्याचा डाव नरेंद्र मोदी-अमित शहा या जोडगोळीने आखला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे.    


रफाल विमानाच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणारे केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक आलोक वर्मा,  विशेष संचालक राकेश अस्थाना या अधिकाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घटनेची पायमल्ली करत हुकूमशाही पद्धतीने कारवाई करण्यात आली. त्याविरोधात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी  आकुर्डी येथील सीबीआय कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली या वेळी निदर्शनेही करण्यात आली. त्या वेळी सत्यजित तांबे बोलत होते.   


तांबे म्हणाले, रफाल विमान खरेदीमध्ये एचएएल या भारतातील अव्वल कंपनीला डावलून उद्योगपती अनिल अंबानींना कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे माजी खासदार तसेच देशाचे माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी, ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सीबीआयचे वर्मा यांच्याकडे केली होती. त्यासंदर्भात वर्मा यांनी महत्त्वाची माहिती आणि कागदपत्रे जमा केली होती. परंतु, आपला घोटाळा जनतेसमोर येईल व पितळ उघडे पडेल याची भीती चौकीदारांना होती. म्हणूनच घटनेचा अनादर करत एका रात्रीत वर्मा आणि अस्थाना यांची बेकायदेशीरपणे बदली करण्यात आली. घटनेनुसार या संचालकांची बदली करण्यासाठी पंतप्रधान, विरोधी पक्षनेता, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची बैठक होऊन निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु, हे सर्व कायदेशीर संकेत धुडकावून मोदींनी हुकूमशाही पद्धतीने बदली केली, असे तांबे यांनी सांगितले. मोर्चावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. 

 

बातम्या आणखी आहेत...