आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे पोलिस दलात DRDOचा ‘दक्ष’ रोबोट दाखल...स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित BDDS साठी उपयुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राज्यात प्रथमच पुणे पोलिसांनी डिफेन्स रिसर्च अॅण्‍ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनकडून (डीआरडीओे) बॉम्ब शोधक व नाशक पथकासाठी (बीडीडीएस) ‘आरओव्ही-दक्ष’ नावाचा अत्याधुनिक रोबोट वापरासाठी घेतला आहे. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित हा रोबोट बीडीडीएस पथकाच्या कामासाठी महत्त्वपूर्ण असून रिमोटद्वारे तो संचालित करता येणार असल्याची माहिती पुणे शहर पोलिस आयुक्त डॉ..के.व्यंकटेशम यांनी दिली आहे.

 

डीआरडीओकडून संबंधित रोबोट बीडीडीएसमध्ये दाखल होण्यासाठी यापूर्वीच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळापासून पोलिस प्रयत्नशील होते. जुलै महिन्यापासून या कामास गती मिळाली आणि प्रत्यक्षात बुधवारी बीडीडीएस पथकात त्यांचा समावेश केला जाणार आहे. हा रोबोट चालवण्यासंदर्भात बीडीडीएसमधील कर्मचाऱ्यांनी दोन आठवड्यांचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. यापूर्वी नॅशनल पोलिस अकादमी येथे संबंधित दक्ष रोबोटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले होते. पुणे पोलिस हा रोबोट सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर मोफत वापरणार असून त्यानंतर गरजेनुसार तो विकत घेतला जाणार आहे. यापूर्वी वापरण्यात येणारे रोबोट हे परदेशी तंत्रज्ञानावर आधारित असल्याने त्याची किंमत मोठी होती आणि त्याचा खर्च उचलणे पोलिस आयुक्तालयास जिकिरीचे होते. मात्र, दक्ष रोबोट प्रायोगिक तत्त्वावर वापरण्यास मिळाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेत यापुढील काळात वाढ होर्इल. राज्यातील नक्षलवाद आणि दहशतवादविरोधी ऑपरेशनमधील अधिकारी आणि डीआरडीओेचे शास्त्रज्ञ यांच्यात दोन महिन्यांत बैठक होणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष प्रतिकूल परिस्थितीत वापरता येऊ शकेल, अशा प्रकारे कोणती नवीन उपकरणे अथवा सुधारणा करता येतील याबाबत कार्यशाळा घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त व्यंकटेशम यांनी दिली.

 

आरओव्ही- दक्ष रोबोटची वैशिष्ट्ये...
- रिमोटवर चालवता येण्याची सुविधा   
- एखाद्या इमारतीच्या पायऱ्या चढण्याची क्षमता   
- संशयित वस्तूची सुरक्षित हाताळणी   
- 25 किलोपर्यंत वजन उचलण्याची क्षमता   
- वाळू, दलदल अशा ठिकाणी सुयोग्य हालचाली   
- एक किलोमीटरपर्यंत रिमोटद्वारे संचालित

 

बातम्या आणखी आहेत...