आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या अयाेध्येतील जाहीर सभेला परवानगी नाही..फक्त रामललाच्या दर्शनास जाणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राम मंदिर उभारण्याची हाक देण्यासाठी थेट अयाेध्येत जाऊन २५ नाेव्हेंबर राेजी जाहीर सभा घेण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न भंगले अाहे. संवेदनशील अयोध्येत धार्मिक तेढ निर्माण होऊ नये म्हणून काेणत्याही धार्मिक, राजकीय पक्ष-संघटनांनी या ठिकाणी सभा घेऊ नये, असे काेर्टाचे अादेश अाहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश पाेलिसांनी ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली नाही.   


शिवसेना खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर या सभेसाठी एक महिन्यापासून प्रयत्न करत होते. ही सभा भव्य-दिव्य हाेणार अशी वातावरण निर्मितीही शिवसेनेच्या गाेटातून केली जात हाेती. या सभेसाठी राऊत, नार्वेकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल राम नाईक  यांचीही भेट घेतली हाेती. मात्र, न्यायालयाचा निर्णय असल्याने सभेला परवानगी देता येत नसल्याचे सांगत उत्तर प्रदेश सरकारने शिवसेनेची विनंती मान्य केली नाही. त्यामुळे अपेक्षाभंग झालेेले शिवसेनेचे नेते अाता घूमजाव करू लागले अाहेत. ‘अाम्ही सभेची वा रॅलीची परवानगी मागितलीच नव्हती. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यातही असा कोणताही कार्यक्रम नव्हता,’ अशी सारवासारव बुधवारी खासदार संजय राऊत यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केली.

 

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राम मंदिर उभारण्याचा मुद्दा उपस्थित करत मित्रपक्ष भाजपला चुचकारण्याचा प्रयत्न केला हाेता. एवढ्यावरच न थांबता २४ व २५ नाेव्हेंबर राेजी अयाेध्या दाैऱ्याचे अायाेजनही केले हाेते. या दाैऱ्याची संपूर्ण जबाबदारी खासदार संजय राऊत यांच्यावर हाेती. त्यामुळे  राऊत सतत अयोध्येला जाऊन दौऱ्याची आखणी करत होते. तेथील अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन सभेची परवानगी घेण्याचा प्रयत्न सुरू होता.  या सभेला महाराष्ट्रातून माेठ्या प्रमाणावर शिवसैनिक येणार असल्याचा दावाही शिवसेना नेत्यांकडून केला जात हाेता. इतकेच काय, या सभेसाठी उद्धव ठाकरे हिंदी भाषणाचा सराव करत होते.

 

 दरम्यान, याच काळात विश्व हिंदू परिषद व संत- महंतांनीही राम मंदिराच्या मागणीसाठी अयाेध्येत धर्मसभा घेण्याचे नियाेजन केले हाेते. त्यामुळे तणाव निर्माण हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात हाेती. मात्र, अाता सभेला परवानगी नसल्याने उद्धव ठाकरे संत- महंतांच्या उपस्थितीत रामललांचे दर्शन घेतील. या वेळीही त्यांना साेबत फक्त ४-५ जणांनाच घेऊन जाता येईल. 

 

संत-महंतांकडून हाेणार उद्धव ठाकरे यांचा सत्कार  
खासदार संजय राऊत यांनी सांगितले, ‘उद्धव ठाकरे अयोध्येत सभा घेणार आहेत, असे आम्ही कधीही म्हटले नव्हते.  शरयू नदीच्या काठी आरती, रामललांचे दर्शन आणि लक्ष्मण किल्ला परिसरात उद्धव यांचा संत-महंतांकडून सत्कार असे  फक्त कार्यक्रम ठरवले हाेते. महाअारतीच्या वेळी लाखाे हिंदू उपस्थित राहणार अाहेत, त्याला एखाद्या रॅलीचेच स्वरूप येणार अाहे. 

 

राज्यातही शिवसैनिक करणार महाअारती
‘उद्धव २४ नोव्हेंबर रोजी अयोध्येला जाणार अाहेत. त्यांच्या हस्ते शरयू नदीकाठी होणाऱ्या आरतीच्या वेळी महाराष्ट्रातील इतर शहरांतही त्याच वेळेस महाआरतीचा कार्यक्रम हाेणार अाहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी युवा सेना आणि महिला सेनेच्या कार्यकर्त्यांनी अयोध्येला न येता राज्यातच राहून महाआरती करावी, अशा सूचना दिल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

 

वादग्रस्त जागेवर बंदाेबस्त, पाेलिसांना याेगींच्या सूचना  
अयोध्येत शिवसेनेसोबतच विश्व हिंदू परिषदेनेही कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या दोन कार्यक्रमांमुळे कायदा-सुव्यवस्थेची घडी बिघडू नये म्हणून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी पाेलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत ट्रॅफिक, पार्किंग आणि अन्य सुविधा योग्यरीत्या पुरवण्याचे आदेश दिलेले आहेत. विहिंपच्या धर्मसभेचे ठिकाण विवादास्पद जागेपासून दूर आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे लाेक विवादित जागेकडे जाण्याची शक्यता असल्याने या स्थळाच्या चारही बाजूंनी बॅरिकेड्स लावले अाहेत तसेच बंदाेबस्तही वाढवण्यात अाला अाहे. उद्धव ठाकरे यांना रामललांच्या दर्शनासाठी ठराविक वेळेत जावे लागणार असून सोबत मोठ्या संख्येने शिवसैनिकांना नेण्यास बंदी आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...