Home | Maharashtra | Mumbai | MNS Chief Raj Thackeray reaction on avni tigress death issue

वाघिणीची हत्या करणाऱ्या भाजप सरकारचा माज उतरवायलाच हवा:व्यंगचित्रातूनही फटकारे

विशेष प्रतिनिधी | Update - Nov 08, 2018, 10:46 AM IST

सरकारला सत्तेचा माज आलाय,’ अशा कठोर शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी फडणवीस सरकारवर तोफ डागली.

 • MNS Chief Raj Thackeray reaction on avni tigress death issue

  मुंबई - ‘यवतमाळ जिल्ह्यातील अवनी वाघिणीला मारण्याची गरज नव्हती. बेशुद्ध करून तिचे संगोपन करता आले असते. मात्र आपण जे करतो ते सर्व योग्यच असा या सरकारचा भ्रम असून या सरकारला सत्तेचा माज आलाय,’ अशा कठोर शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी फडणवीस सरकारवर तोफ डागली. त्यांच्या तडाख्यातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हेदेखील सुटले नाहीत. फक्त ‘वाघाचे पुतळे उभारून वाघांची संख्या वाढणार नाही. त्यासाठी काम करावे लागते,’ असा टोलाही त्यांनी मुनगंटीवार यांना लगावला.


  अवनी वाघिणीच्या वादग्रस्त मृत्यूनंतर केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले असतानाच या वादात आता राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. ‘वाघ हा प्राणी आता दुर्मिळ होत असताना वन खात्याने केलेले कृत्य योग्य नाही,’ असे सांगत राज ठाकरे म्हणाले की, ‘या वाघिणीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल आपल्याला अतीव दुःख आहे. मात्र एखाद्या प्राण्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे तंत्रज्ञान विकसित झालेले असतानाही या वाघिणीला थेट गोळ्या घालण्याची काय आवश्यकता होती? तसेच मनेका गांधी यांनी त्यावर आक्षेप घेताच त्यावर बेफिकिरीने एवढे बोलण्याचीही काही आवश्यकता नव्हती. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री आहेत याचा अर्थ त्यांना वन या विषयातले सगळे कळते असे नव्हे. आज मंत्रिपद आहे. उद्या ते जाईलसुद्धा, मग काय कराल,’ असा खोचक सवालही राज यांनी या वेळी केला. यांचे सरकार मोदींच्या जिवावर असून मोदींना माज आला आहे म्हणून यांनाही माज आला आहे. मात्र आता घोडा-मैदान जवळच असून यांचा माज उतरवणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.


  सगळा देश अंबानीला विकायला काढलाय का?
  विशेष म्हणजे अवनी या वाघिणीच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर केलेल्या आरोपांचीच री ओढत राज ठाकरे म्हणाले की, या वाघिणीचा वावर असलेल्या ठिकाणाहून अनिल अंबानींचा प्रकल्प ६० किमीवर आहे. त्यांना त्रास होतो म्हणून वाघिणीला मारले. कोण अनिल अंबानी? सगळा देश काय अंबानीला विकायला काढला आहे का, असा सवाल करत या सरकारचे भान सुटल्याचे ते म्हणाले. देशात एवढी ओसाड जमीन पडलेली असताना उद्योग उभारायला यांना जंगलेच का हवीत, असा परखड सवालही राज ठाकरे यांनी केला.

  माेदी, फडणवीस, गडकरी यांच्यावर साधला निशाणा
  सध्या राज ठाकरे यांनी दिवाळीचे औचित्य साधून राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी व्यंगचित्र मालिका सुरू केली आहे. आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर काढलेल्या व्यंगचित्रातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस या तिघांच्या फोटोसमोर लक्ष्मी उभी आहे, असे दाखवण्यात आले असून ती म्हणतेय की, ‘बाबांनो, गेल्या साडेचार वर्षांत जनतेसमोर तुम्ही फेकलेल्या लाख आणि कोटींच्या आकड्यांनी मी थक्क झाले आहे.’

Trending