आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेला आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीत चर्चा; मात्र उत्तर भारतीय वोट बँक दुरावण्याची भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मनसेला स्थान द्यावे का? या पर्यायावर सध्या दोन्ही काँग्रेस विचार करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या नेत्यांदरम्यान झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मात्र उत्तर भारतीय वोट बँक दुरावेल, या कारणास्तव काँग्रेसने या प्रस्तावाला सध्या विरोध केला असला, तरीही सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काँग्रेसने हा प्रस्ताव पुर्णत: फेटाळलेला नाही.


भाजप सेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी शक्य त्या सर्व पर्यायांचा अवलंब करण्याचे धोरण सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अवलंबिले असून समविचारी पक्षांची मोट बांधण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. या प्रक्रियेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर, रिपाईचे जोगेंद्र कवाडे, तसेच शेकापसह डाव्या पक्षांच्या नेत्यांशी आगामी निवडणुकीत आघाडी करण्याच्या दृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्राथमिक चर्चा केली आहे. या पक्षांसोबतच मनसेलाही सोबत घेण्याचा विचार पुढे आला असून दोनच दिवसांपुर्वी विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीच तशा आशयाचा प्रस्ताव चर्चेदरम्यान ठेवला. मनसे जरी समविचारी पक्ष नसला तरीही विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी मनसेलाही सोबत घ्यावे असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. मात्र या प्रस्तावाला काँग्रेसने तुर्तास विरोध केल्याचे समजते. मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसची पारंपरिक वोट बँक असलेली उत्तर भारतीय मते दुरावतील, असे मत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी मांडल्याचे समजते. सध्या तरी या प्रस्तावावर कोणताही अंतिम निष्कर्ष या बैठकीत निघू शकलेला नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना विचारले असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. महाराष्ट्रात विरोधकांची एक मोठी आघाडी असावी, अशी आम्हा दोन्ही पक्षांची भुमिका आहे. या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान राज्यात विरोधी गटात असलेल्या प्रत्येक पक्षासोबतच्या राजकीय फायद्या तोट्याची गणिते मांडली जाणे अपेक्षित आहे. मात्र मनसेला सोबत घ्यावे किंवा नाही याबाबतचा अंतिम निर्णय आमचे वरिष्ठ नेते घेतील, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

 

गेल्या काही दिवसांपासून मनसे नेते राज ठाकरे आणि शरद पवार यांची जवळीक वाढू लागली आहे. दोन तीनदा हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. विशेष म्हणजे भाजपला सत्तेतून पायऊतार करण्यासाठी विरोधकांची आघाडी असावी, याबाबत खुद्द राज ठाकरे यांनीही भाष्य केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून आपल्या व्यंगचित्रांमधून राज यांनी राहूल गांधींच्या राजकीय भुमिकांची केलेली प्रशंसा आणि दोन दिवसांपुर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिलेल्या जाहीर शुभेच्छा अशा बाबीही सूचक मानल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...