आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-भाजप ही निवडणूकही राम मंदिराचा आधार घेवूनच लढणार का; आमच्यासाठी तर दुष्काळच महत्त्वाचा- सुप्रिया सुळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- निवडणुका आल्या की, शिवसेना आणि भाजपला श्रीराम दिसतात. हाती सत्ता असताना सहाशे कोटी रुपयांचे कार्यालय बांधले जातात. मात्र आम्हाला या सगळ्या गोष्टींपेक्षा दुष्काळाच्या झळा सहन करणारा शेतकरी, नागरिकांची, तरुणांची मदत करणे महत्त्वाचे वाटते. हा आमच्यातील आणि सत्ताधाऱ्यांमधील मूलभूत फरक आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी एका कार्यक्रमासाठी शहरात आल्या असता त्यांनी महिला पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी चर्चा देखील केली.

 

सध्या सर्व यंत्रणांनी वादविवाद बाजूला ठेवून दुष्काळावर लक्ष केंद्रित करायला हवे. सर्वांना पिण्यासाठी पाणी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे आहे ते कर्ज सरसकट माफ करायला हवे. कर्नाटक राज्यातील सरकार करत असेल तर महाराष्ट्र सरकारने देखील करायला काय हरकत आहे. असे मतही सुळे यांनी व्यक्त केले.

 

सध्या सर्वात चर्चेत असलेल्या 'मी टू' या चळवळी विषयी बोलतांना त्या म्हणाल्या की, 'मी टू' च्या निमित्ताने महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी समोर येवून बोलत आहे. ही चांगली गोष्ट असून, अनेक महिला आहेत. ज्या आजही विविध क्षेत्रात अन्याय सहन करतायेत. विशाखा समिती चांगल्या उद्देशाने करण्यात आली. परंतु तिची अंमलबजावणी आपल्याकडे योग्य रित्या होत नाही. आमची सत्ता असतांना आम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी महाविद्यालय आणि शाळांमध्ये तक्रार समिती सुरु केली होती. जी या सरकारने सत्तेत येताच बंद केली. मी टू चळवळ गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ती केवळ बातम्यांपूर्ती किंवा काही दिवसांपूर्ती मर्यादित राहता कामा नये. ज्या महिला पत्रकारांनी देखील त्यांच्यावरील अन्याय विषयी जाहीर केले. त्यांच्यावर आरोप करण्यात आले. खरं तर एम.जे. अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या वीसच्या वीस महिला खोटया कशा असतील. एक आरोप खोटा असू शकतो, वीस नाहीत. राज्य महिला आयोगाने दखल घेत कारवाई करण्याची गरज होती. परंतु आजही राम कदमसारखे आमदारही काहीही बोलतात. त्यांच्यावर राज्य महिला आयोग काहीच करत नाही. असेही सुळे म्हणाल्या.

 

एवढेच नाही तर भाजपाचे आमदार पुण्यात खंडणी मागतात, मुलींना पळवून नेण्याची भाषा करतात. असे असतांना मुख्यमंत्री देखील काहीच बोलत नाहीत. त्यांना मूल्यांपेक्षाही सत्ता महत्त्वाची वाटते. अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

'स्कील इंडिया' फेल -
मेक इन इंडिया, स्कील इंडियाचा नारा देणारे पंतप्रधान यांचे प्रत्येक आश्वासन खोटे ठरले आहे. तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देवू असे आश्वासनही देण्यात आले. परंतु आज लाखोंच्या संख्येने तरुण बेकार आहेत. जीएसटी,नोट बंदीचा फटकाही सर्वांना बसला असून, ज्या मुद्रालोनचा गवगवा राज्य सरकार करते. त्या मुद्रालोनमध्येही सर्वाधिक भ्रष्टाचार झाला आहे.

 

सीबीआयमधील उलथापालथ हास्यास्पद -
सध्या भ्रष्टाचार,लाचखोरी आणि कुरघोडीचे राजकारण यामुळे देशाची सर्वात मोठी तपास यंत्रणा सीबीआय ची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. यावर प्रश्न विचारला असता. सुळे म्हणाल्या, आलोक वर्मा आणि अस्थाना यांना रजेवर पाठवणे आणि त्यांच्यातील अंतर्गत वाद बाहेर येणे ही हास्यास्पद बाब वाटते. सीबीआयवरील इतक्या वर्षांच्या विश्वासाला प्रधानमंत्रींमुळे तडा गेला आहे. आता सीबीआयवर विश्वास कसा ठेवणार असा देखील प्रश्न निर्माण होत असल्याचे त्या म्हणाल्या.

 

महिला सुरक्षा महत्त्वाची -
आमची सत्ता आल्यास महिला सुरक्षा, शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे असतील. 2019 पेक्षा जास्त लक्ष 2014 वर आहे.याशिवाय आपले लक्ष विधानसभा नसून लोकसभा लढणार असल्याचेही सुळे यांनी यावेळी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...