आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-राष्ट्रवादी रस्त्यावर उतरताच जळगावमध्ये \'हर हर माेदी\'चा गजर!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले भाव, महागाई याकडे केंद्र आणि राज्यातील सरकारचे लक्ष वेधण्यासाठी साेमवारी घाेषित करण्यात अालेला भारत बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या कांॅग्रेस, राष्ट्रवादी, मनसे अाणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांना भाजप कार्यकर्ते अाणि व्यापाऱ्यांनी हरहर माेदीच्या घाेषणांनी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जळगावात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर उतरून दाणा बाजार, फुले व्यापारी संकुल, गोलाणी व्यापारी संकुल बंद पाडले. व्यापाऱ्यांनी बंद हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी दाेन वेळा मार्केटकडे माेर्चा वळवला. अखेर दाेन तास बंद पाळून व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. 


इंधन दरवाढ आणि महागाईच्या विरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला साेमवारी जळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कांॅग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अाणि समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्रीतपणे मार्केट बंदचे अावाहन केले. सर्वच पक्षातर्फे सकाळी १० मार्केटमध्ये बंदचे अावाहन करण्यात अाले. मात्र, अवघ्या दोन तासानंतर म्हणजेच दुपारी १२ वाजेनंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने उघडली. तसेच बंदच्या आंदोलनाने पदाधिकारी व कार्यकर्ते यांना चांगलाच घाम फोडला. सकाळी १०.३० वाजता कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, समाजवादी पक्षाचे मुफ्ती हारून नदवी, मनसेचे जमील देशपांडे यांनी फुले व्यापारी संकुलापासून बंदच्या आंदोलनाला सुरुवात केली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी फुले व्यापारी संकुल, दाणा बाजार, नवीपेठ, गोलाणी संकुल, टॉवर चौक, सराफ बाजार येथे दुकानदारांना आवाहन करून बंद पाळण्यास सांगितले. काही व्यापाऱ्यांनी त्या ला प्रतिसाद दिला. 


कार्यकर्ते अन‌् व्यापाऱ्यांमध्ये वाद; आंदोलकांची उडवली खिल्ली 
बंदच्या आंदोलनावेळी नेत्यांनी आवाहन केल्यानंतरही फुले व्यापारी संकुलातील काही दुकाने उघडली होती. त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही दुकाने बंद करण्यास सांगितले. तेव्हा पोलिस, कार्यकर्ते आणि व्यापारी यांच्यात काहीकाळ वाद झाला होता. आंदोलकांनी आपला मोर्चा गोलाणी व्यापारी संकुलाकडे वळवल्यानंतर व्यापाऱ्यांनी पटापट आपली दुकाने बंद केली. या वेळी पोलिस, व्यापारी आणि आंदोलकांची चांगलीच धावपळ उडाली. आंदोलक जेव्हा फुले व्यापारी संकुलात बंदचे आवाहन करत तळमजल्यात आले, तेव्हा या संकुलातील व्यापाऱ्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरून दुकाने बंद करत 'मोदी..मोदी..मोदी..., हर हर मोदी, घर घर मोदी, जय श्रीराम, जय भवानी-जय शिवाजी,' अशी घोषणाबाजी करून आंदोलकांची खिल्ली उडवली. 


अांदाेलनात यांचा सहभाग 
बंदच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विलास पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे, राष्ट्रवादीचे जिल्हा समन्वयक विकास पवार, संजय चव्हाण, राजेश पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष ललित बागुल, राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा सविता बोरसे, माजी शहराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, माधुरी पाटील, नामदेव चौधरी, कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा अरुणा पाटील, एनएसयूआयचे देवेंद्र मराठे, राष्ट्रवादीच्या युवती प्रमुख कल्पिता पाटील, उज्ज्वल पाटील, राजस कोतवाल, प्रा. संजय पाटील, जगदीश बढे, ज्ञानेश्‍वर कोळी, परवेज पठाण, अतुल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. जळगावात व्यापार्‍यांकडून 'हर हर मोदी'च्या घोषणा

 

बातम्या आणखी आहेत...