वाघिणीने ठार केलेल्या / वाघिणीने ठार केलेल्या व्यक्तींच्या दुदैवी कुटुंबांचा विचार कधी करणार..नितिन गडकरींकडून वनमंत्र्यांना क्लीनचिट

Nov 10,2018 07:16:00 AM IST

नागपूर- अवनी वाघिणीला ठार करावे लागले, याचे दु:खच आहे. मात्र, वाघिणीमुळे ठार झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांचे काय? त्यांच्या घरात दिवाळी कशी साजरी झाली, याचा विचार आपण कधी करणार आहोत? या मुद्यावर सध्या नुसतेे राजकारण सुरु असून या संपूर्ण प्रकरणात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुठेही दोष नाही, या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वनमंत्र्यांना शुक्रवारी क्लीनचिट दिली.

यवतमाळ जिल्ह्यातील टी-1 उर्फ अवनी या वाघिणीला ठार करण्यात आल्याच्या घटनेनंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप होत आहेत. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता गडकरी यांनी या संपूर्ण प्रकरणात मुनगंटीवार यांचा कुठेही दोष नसल्याचे स्पष्टच सांगितले. वाघिणीला ठार मारावे लागल्याचे दु:खच आहे. पण त्यावर काय उपाय होता? आणखी किती लोकांचा जीव धोक्यात घालायचा, याचाही विचार झाला पाहिजे. नरभक्षी वाघिणीने आजवर तेरा जणांचा बळी घेतला आहे. त्या व्यक्तींच्या कुटुंबावर कुठला प्रसंग उद्भवला, त्यांची दिवाळी कशी गेली? याचाही विचार झाला पाहिजे. या प्रकरणात कारण नसताना राजकारण आणले जात आहे, हे अतिशय खेदजनक आहे, असे गडकरी म्हणाले.

महाराष्ट्रात 14 कोटी वृक्ष लावण्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे योगदान दिले आहे. त्याकडे आपण दुर्लक्ष करणार काय? नागपूर हे टायगर कॅपिटल करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या प्रयत्नातून अनेक चांगल्या योजना आल्यात. ही कामगिरी दुर्लक्षित करून आम्ही केवळ त्यांच्यावर टीकाच करायची काय, याचाही विचार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

X