आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार म्हणजे \'ठग्ज ऑफ महाराष्ट्र\' विरोधकांचा टोला; CM म्हणाले विरोधी पक्षाला \'गँग्ज ऑफ वासेपूर\' म्हणू का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्य सरकारचा गेल्या चार वर्षांतील कारभार पाहता हे सरकार म्हणजे "ठग्ज ऑफ महाराष्ट्र' असल्याची टीका विखे पाटील यांनी केली. सर्वच मुद्द्यांवर या सरकारने जनतेची फसवणूक केली असल्याचे ते म्हणाले. विशेष म्हणजे विरोधकांच्या पत्रकार परिषदेच्या व्यासपीठामागे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची छबी असलेले 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' या शीर्षकाचे पोस्टर लक्ष वेधून घेत होते. ज्या जनतेने 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान' चित्रपट फ्लॉप केला, तीच जनता आगामी निवडणुकीत या सरकारलाही भुईसपाट करेल, असेही विखे पाटील म्हणाले.

 

विरोधी पक्षाला गँग्ज ऑफ वासेपूर म्हणू का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीही नसल्यामुळे ते फिल्मी स्टाइलचा वापर करत आहेत. त्यांनी पोरकटपणा थांबवावा. त्यांनी सरकारला 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हटले त्यावरून मी त्यांना 'गँग्ज ऑफ वासेपूर' म्हणू का, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

 

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, अधिवेशनात आम्ही दुष्काळाबाबत सरकारने केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती देऊ. राज्यात सरासरी 74 टक्के पाऊस पडला असून मराठवाड्यात 50 टक्क्यांहून कमी पाऊस पडला आहे. दुष्काळाच्या निकषांचा अभ्यास करून सरकारने नियमाप्रमाणे 31 ऑक्टोबर रोजीच राज्यात दुष्काळ जाहीर केला. तसेच 1 नोव्हेंबर रोजी राज्याच्या निकषांप्रमाणे आणखी 261 मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर केला. केंद्र सरकारला 7500 कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. पिण्याच्या पाण्याचे संभावित दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येत आहेत. पाण्यासाठी तीन टप्प्यात योजना राबवण्यात येणार असून डिसेंबरपर्यंत पहिला टप्पा, डिसेंबर ते मार्च दुसरा टप्पा आणि मार्च ते पाऊस पडेपर्यंत तिसरा टप्पा अंमलात आणून उपाययोजना केल्या जातील. चारा उगवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. विरोधकांनी राजकारण करण्याऐवजी उपाययोजना सुचवाव्यात, असेही मुख्यमंत्री म्हणाले, त्यांच्या काळातील कर्जमाफीची यादी द्यावी. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. सुरुवातीला यात काही त्रुटी होत्या आणि आम्ही त्या मान्यही केल्या होत्या त्या त्रुटी नंतर दूर करण्यात आल्या. मात्र विरोधक सुरुवातीच्यात प्रकरणांची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.

 

आमच्याकडे कर्जमाफी केलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण यादी असून विरोधकांच्या काळात झालेल्या कर्जमाफीची यादी त्यांनी द्यावी. सरकारने 35 हजार 200 बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना 2258 कोटी रुपये दिले आहेत. मागील सरकारने बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना याच्या निम्मीही मदत दिली नव्हती असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...