आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणता झेंडा घेऊ हाती..भाजपच्या संपर्कातील राजेंद्र मस्के सोमवारी घेणार राजकीय निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीड जिल्हा परिषदेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के हे ग्रामविकास मंत्री  पंकजा मुंडे यांच्या संपर्कात आहेत. याच संपर्कातून पंकजा मुंडे यांनी मस्के यांच्या जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांची कामे मंजूर केली आहेत.

 

दुसरीकडे, बेलेश्वरच्या कार्यक्रमात मात्र शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मस्के यांच्या कार्यकर्त्यांनी 'बीड का आमदार कैसा हो राजेंद्र मस्के जैसा हो,' अशा घोषणा दिल्या .याच कार्यक्रमात भाषणात आमदार मेटे यांना खुलासा करावा लागला होता की, पुढे बीडचा आमदार मीच होणार असून राजेंद्र मस्के मलाच साथ देणार आहेत. या कार्यक्रमांनतर आमदार मेटे व मस्के यांच्यातील दुरावा वाढत गेला होता. पक्षातील शिस्त मस्के यांनी पाळली नाही म्हणून  शिवसंग्रामच्या युवा प्रदेशाध्यक्ष या पदावरून त्यांना पायउतार व्हावे लागले. भाजपाशी घरोबा केलेले राजेंद्र मस्के यांनी एक महिन्याच्या काळात कुठलाच राजकीय निर्णय घेतलेला नव्हता. आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोमवारी राजेंद्र मस्के हे त्यांच्या बीड शहराजवळील चऱ्हाटा फाट्यावरील छावणीत समर्थकांची एक बैठक घेवून चर्चा करणार असून याच बैठकीत ते कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेणार आहेत. या बैठकीस बीड विधानसभा मतदार संघातील त्यांचे चार हजार समर्थक उपस्थित राहणार आहेत.

 

मस्के यांना जिल्हाध्यक्ष पदाची ऑफर

जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा मुंडे व विनायक मेटे यांच्यात सख्य नाही. पंकजा मुंडे यांनी आमदार मेटे यांचा पावरफूल नेता असलेले राजेंद्र मस्के यांना भाजपच्या संपर्कात आणून मेटे यांना चांगलाच शह  दिला आहे. त्यामुळे राजेंद्र मस्के यांना लवकरच भाजपचे जिल्हाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता आहे. परंतु बीड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार कोण हे मात्र अजून निश्चित झालेले नाही. कारण, बीडमध्ये पक्षावर नाराज असलेले राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसागर हे पंकजा मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहेत.एैनवेळी जर राष्ट्रवादीने पुतणे संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली तर क्षीरसागर यांना भाजप हाच एकमेव पर्याय आहे. मग अशावेळी राजेंद्र मस्के यांच्या बाबतीत भाजप काय निर्णय घेईल, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

 

शिवसेनाही असू शकतो पर्याय
बीड विधानसभा मतदार संघात राजेंद्र मस्के यांचा चांगला संपर्क असून शिवसेनेसाठी मस्के हे फायद्याचे ठरु शकतात. कारण मस्के यांची पत्नी बीड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा असून ही त्यांची जमेची बाजूआहे.त्यामुळे सोमवारच्या बैठकीत मस्के यांनी कोणत्या पक्षात जायचे यावर निर्णय घेतला तर त्याच निर्णयावर बीड विधानसभा मतदार संघातील बरीचशी समीकरणे बदलू शकतात, हे मात्र निश्‍चित.

बातम्या आणखी आहेत...