आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चोरी... सोन्याच्या दागिन्यांसह 70 हजार रुपयांची रोख रक्कम केली लंपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळनेर- मोरया सोसायटीत रविवारी (ता. 28) रात्री पुन्हा धाडसी चोरी झाली. एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी 5 तोळे सोने व 70 हजार रोख रक्कम चोरून नेली. मोरया सोसायटीत मोठ्या प्रमाणात नोकरदारवर्ग वास्तव्यास आहे. दरम्यान या नागरी वस्तीत  गेल्या काही दिवसांपासून कुलूपबंद घरांना लक्ष्य करीत चोरांनी शनिवारी रात्री एकाच रात्रीत चार ठिकाणी घरफोडी करून खळबळ माजवली होती. त्यात फारसे नुकसान झाले नव्हते. परंतु रविवारी रात्री पुन्हा धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

घरमालक विलास ठाकरे हे मागील 10 दिवसांपासून लासुर (ता.चाळीसगाव) येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यामुळे घराला कुलूप लावले होते. चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधत कुलूपबंद घरांना लक्ष्य करून घरफोडी केली आहे. या घटनेत अजून नेमके किती नुकसान झाले याची माहिती मिळाली नाही.

 

नागरिक भयभीत...

येथील वसाहतीत बहुतांश नोकरदार वर्ग बाहेरगावाहून आलेला असल्याने ते सुटीच्या कालावधीत आपल्या मूळगावी जात असतात.सध्या दिवाळी सण तोंडावर आल्याने सुटी लागल्यानंतर बाहेर गावी जावे की नाही असा प्रश्न कॉलनीतील नागरिकांना पडला आहे.
 दरम्यान घराला कुलूप असल्याचा नेमका फायदा घेत चोरांनी कुलूप बंद घरांना लक्ष्य केले आहे. शनिवारी राजे पार्क,मोरया सोसायटी, सुमन नगर या एकाच परिसरातील  चार घरांना फोडण्यात आले होते. चारही घराचे समोरच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला होता.घरातील आलमारी फोडून सामानाची नासधूस केली होती.नेमक्या त्याच पद्धतीने ही घरफोडी करण्यात आलेली आहे.यामुळे चोरट्यांची मोठी टोळी असल्याची दाट शक्यता आहे. सकाळी शेजारील रहिवाशांनी घटनेची माहिती विलास ठाकरे यांना दिली त्यांनी तत्काळ आपल्या जावाईंना घटनास्थळी जाण्याचे सांगितले व ते साक्री येथून दाखल झाले. मोरया सोसायटीत राहणाऱ्या विलास भगवान ठाकरे यांचे घराच्या  दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व दोन्ही शोकेस कपाटचे लॉकर तोडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले व त्यातील ७० हजार रक्कम व एक सोन्याचा हार, लहान बाळाच्या सोन्याच्या अंगठ्या असा ५ तोळे दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान काल शनिवार रोजी याच परिसरात केलेल्या चारही चोऱ्यात चोरट्यांना यश न आल्याने त्यांनी पुन्हा रविवारी रात्रीच्या सुमारास कुलूपबंद घराला लक्ष्य केले आहे.

 


सर्वच घटनांमध्ये साधर्म्य...

गेल्या दोन दिवसांत झालेल्या घरफोडीत पाचही घरांचे कुलूप एकाच पद्धतीने तोडण्यात आले होते.घरातील आलमारीचे कुलूपही तोडण्यात आले होते. आलमारीतील साहित्य बाहेर अस्ताव्यस्त फेकण्यात आले होते. आलमारीचे लॉकर उघडलेले होते.चोरट्यांनी आधी या भागातील घरांची पाहणी केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली व पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. कुलूप तोडताना लोखंडी साधनांचा वापर करून तोडल्याचे निदर्शनास आले.

 

खबरदारी घेण्याचे आवाहन...

बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबीयांनी घराची योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन पिंपळनेर पोलिसांनी केले आहे. सध्या दिवाळीचा सण  येत असल्यामुळे बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीचा फायदा घेत चोरीच्या घटना घडतात. कुटुंबीयांनी घराच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन बाहेरगावी जावे व घराबाहेरील लाईट रात्रीच्या वेळी सुरू ठेवावा. संशयित आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी.
- पंजाबराव राठोड, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पिंपळनेर

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...