आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधामणगाव रेल्वे (अमरावती)- अवैध वाळूचा ट्रक परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदाराच्या वाहनावर घातल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्याजवळ घडली. यात तहसीलदार, चालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
धामणगावचे तहसीलदार अभिजित नाईक यांच्याकडे नुकताच चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला. शासकीय कामानिमित्त ते सोमवारी त्यांच्या शासकीय वाहनाने चांदूर रेल्वे येथे जात होते. सातेफळजवळ एक ट्रक (एमएच 27 बीएक्स 290) अवैधरीत्या वाळूची वाहतूक करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ट्रक चालकाला ट्रक थांबण्यासाठी हात दाखवला, मात्र त्याने ट्रक सुसाट पळवला. दरम्यान, त्याला ओव्हरटेक करत तहसीलदार सामोरे गेले. परंतु, पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने ट्रक थेट शासकीय वाहनावर चढवला. यामध्ये तहसीलदार अभिजित नाईक (40) यांच्या पाठ व हाताला, वाहन चालक महेंद्र नागोसे यांच्या पाठ व कमरेला, तर कर्मचारी प्रकाश बठे यांना डोक्याला मार लागल्याने तिघांनाही चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी तहसीलदार नाईक यांनी तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. दरम्यान, हल्ला चढवणाऱ्या वाळू माफिया व चालकाला अटक तसेच वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल कर्मचारी व लिपिकांच्या बंदोबस्तावर केलेल्या नियुक्त्या बंद होईपर्यंत मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे महसूल संघटनेने जाहीर केले आहे.
पोलिसांत दाखल केली तक्रार
माझ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात कदाचित मला प्राणालाही मुकावे लागले असते. माझ्यासह कर्मचारी व शासकीय वाहनावर हल्ला करून जिवे मारण्याचा वाळू माफियाचा प्रयत्न होता. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
- अभिजित नाईक, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.