आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतीय नसतील तर मुंबई ठप्प होईल, या निरुपम यांच्या विधानावर मनसे संतप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उत्तर भारतीय लोक मुंबई चालवतात आणि त्यांनी काम बंद केले तर मुंबई ठप्प होईल, असे वादग्रस्त विधान करत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी पुन्हा एकदा प्रांतवादाला तोंड फोडले आहे. त्यावर मुंबई बंद करण्याची एवढी धमक होती, तर भारत बंदच्या वेळी आमच्या पाठिंब्याची भीक मागायला का आलात, असे प्रत्युत्तर मनसेने दिले आहे. शिवाय श्वानरुपी निरूपमांची छबी असलेले पोस्टर्स सोशल मीडियावरून पसरवत मनसेनेही या मुद्द्याला हवा दिली आहे. परिणामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर हा मुद्दा पुन्हा पेटण्याचे संकेत मिळत आहेत.

 

नागपूर येथे रविवारी झालेल्या उत्तर भारतीय नागरिकांच्या मेळाव्यात बोलताना संजय निरूपम यांनी नवा वाद निर्माण केला आहे. 2014 साली झालेल्या निवडणुकांमध्ये मुंबईत काँग्रेस आघाडीला सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे भाजपकडे वळलेल्या उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे पुन्हा वळवण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मनसेला विरोध करण्याचे धोरण काँग्रेसने अवलंबले आहे. एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मनसेने फेरीवाल्याविरोधात आघाडी उघडली होती. त्यावेळी फेरीवाल्यांची बाजू घेऊन निरूपम यांनी मनसेला आव्हान दिले होते. इतकेच नव्हे तर कांदिवली येथे फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात मनसेचा एक कार्यकर्ताही जबर जखमी झाला होता. त्यावेळी निरूपम यांच्या चिथावणीमुळेच मनसे कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा आरोप मनसेने केला होता. या पार्श्वभुमीवर निरूपम यांनी नव्याने केलेल्या या वक्तव्यामुळे मनसेच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे. निरूपम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की, ऊठसूट बंद करायला मुंबई म्हणजे प्रदेश काँग्रेसचे ऑफिस नव्हे. निरूपम यांनी फक्त वल्गना करून नयेत तर एकदा खरोखरच मुंबई बंद करून दाखवावी. आणि खरोखरच निरूपय यांची मुंबई बंद करण्याची धमक आहे, तर भारत बंदच्या वेळी आमच्याकडे पाठिंब्याची भीक मागायला का आले होते, याचेही त्यांनी उत्तर द्यावे. शिवाय निरूपम यांच्या मताशी उत्तर भारतीयही सहमत नसतील, कारण स्वत:ची खुर्ची सांभाळण्यासाठी त्यांचे हे उद्योग सुरू असल्याचा टोलाही देशपांडे यांनी हाणला आहे. तर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी निरूपमना जर उत्तर भारतीयांचा एवढा पुळका असेल, तर त्यांनी मुंबई सोडून चालते व्हावे. आम्ही पाहू कशी मुंबई ठप्प होते ते? अशा शब्दांत निरूपम यांना लक्ष्य केले आहे.

 

निरूपम यांच्या विरोधात मनसेची सोशल मीडियावर पोस्टरबाजी
निरूपम यांच्या वक्तव्याचा निषेध करतानाच मनसेने त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्टरबाजी सुरू केली आहे. या पोस्टरबाजीच्या माध्यमातून मनसेने निरूपम यांच्यावर जहरी टीका सुरू केली आहे. बांद्रा येथील मनसेचे विभागध्यक्ष अखिल चित्रे यांनी निरूपम यांच्या निषेधार्थ तयार केलेल्या पोस्टरवर निरूपम यांना श्वान रुपात दाखवले असून त्यांच्या शेजारी उत्तर भारतीय मतांच्या रुपाने असलेल्या हाडांची टोपली दाखवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...