आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांबद्दल अश्लील कविता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या अभ्यासक्रमात आदिवासी महिलांबद्दल अश्लील शब्दांचा वापर केल्याने  नव्या वादाला तोंड फुटले आहे. कवी दिनकर मनवर यांची "पाणी कसं अस्तं' ही कविता कला शाखेच्या तृतीय वर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. यातील काही ओळींवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे, तर विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी थेट कुलगुरू आणि कवीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.   

 

चौफेर टीका झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाने दिनकर मनवर यांची ‘पाणी कसं असतं’ ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्यात आली आहे. अभ्यासक्रम मंडळाच्या बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

 
मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेच्या तृतीय वर्ष मराठी विषय पेपर क्रमांक सहाच्या अभ्यासक्रमात दिनकर मनवर यांची "पाणी कसं अस्तं' ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या कवितेतल्या एका ओळीत पाण्याची तुलना आदिवासी महिलेच्या शरीराशी करण्यात आली आहे. त्यासाठी वापरलेले शब्द हे विद्यार्थ्यांच्या मनास लज्जा उत्पन्न करणारे असल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. कोणत्या निकषांवर या कवितेचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला, असा सवाल करत छात्र भारती या विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ प्रशासनाकडे खुलासा मागितला आहे, तर शिवसेनाप्रणीत युवासेनेच्या सिनेट पदाधिकाऱ्यांनीही या कवितेच्या समावेशाबद्दल प्रशासनाला जाब विचारत विद्यापीठाचे प्र-कुलगुरू रवींद्र कुळकर्णी यांना निवेदन देत ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी केली आहे. दरम्यान, विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांच्या विरोधाची दखल घेत या प्रकरणी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अभ्यास मंडळाची तातडीची बैठक बोलावून निर्णय घेण्याचे आदेश अधिष्ठातांना दिले आहेत. याप्रकरणी मनवर यांच्याशी संपर्क साधण्याचा ‘दिव्य मराठी’ने प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. छात्रभारती या विद्यार्थी संघटनेच्या प्रतिनिधीने मनवर यांच्याशी संपर्क साधला असता, कवितेतील संबंधित ओळ लिहिण्यामागची भूमिका नेमकी काय होती, याबाबत विद्यापीठाला खुलासा करण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. 

 

कवीने तत्काळ माफी मागावी  
मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएच्या कवी दिनकर मनवर यांच्या "दृश्य नसलेल्या दृश्यात’ कविता संग्रहातील ’पाणी कसं अस्तं’ ही  कविता समाविष्ट करण्यात आली आहे. या कवितेच्या माध्यमातून  पाण्याला आदिवासी मुलींच्या नग्न देहाची उपमा देऊन सदर कवीने आदिवासी भगिनींचा विनयभंगच केला आहे. आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारची अश्लील उपमा कवीने दिली आहे. अशा विकृत जातीयवादी मानसिकतेच्या कवींच्या अर्थशून्य कवितांना मंच देऊन भावी पिढीच्या मनात आदिवासी महिलांविषयी अश्लीलतेची बीजे रोेवण्याचा प्रयत्न कुलगुरू आणि सदर कवीने केला आहे. त्यामुळे या दोघांनीही तत्काळ माफी मागावी आणि ही कविता अभ्यासक्रमातून काढून टाकावी.

- जितेंद्र आव्हाड, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

 

नंदूरबारमध्ये निषेध..अॅट्रोसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करा

मुंबई विद्यापीठाच्या तृतिय वर्षाच्या पुस्तकातून कवी मनवर यांनी लिहिलेल्या कवितेत आदिवासी महिलांचा अपमान करण्यात आलेला आहे. केवळ आदिवासी महिलांचाच नाही तर समस्त महिला जातीचा हा अपमान आहे. ही कविता तात्काळ वगण्यात यावी,तसेच कवीवर  अॅट्रोसिटी अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी आदिवासी मुलींनी निवेदनाव्दारे केली आहे.

 

मुंबई विद्यापीठाच्या तृतिय वर्ष कला शाखेच्या पाठयक्रमात "पाणी कसं असतं हे वर्णन करताना कवितेत कवी दिनकर मनवर यांनी आदिवासी मुलींच्या बाबतीत अश्लील शब्दात उपमा दिल्याने नंदुरबार जिल्हयातील आदिवासी विद्यार्थीनींनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. कवितेत वर्णन केलेल्या त्या शब्दांचा जाहीरपणे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

 

जिल्हाधिकारी डॉ मल्लीनाथ कलशेट्टी यांना याबाबतीत निवेदन देण्यात आले.
शिवसेनेच्या युवती जिल्हा प्रमुख मालती वळवी, बबीता गावित, अरूणा गावित, शांती पावरा, शितल गावित, प्रभावती गावित, सागर गावित,चेतन पाडवी तसेच विविध आदिवासी समाजाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

 

१ ऑक्टोंबरला मुंबई विद्यापीठावर राज्यस्तरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्हयातून सर्व समाज बांधव या मोर्चात मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. मनवर यांनी लिहिलेली वादग्रस्त कवितातृतिय वर्षाच्या पुस्तकातून वगळण्यात यावी. तसेच मनवर यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणीही मालती वळवी यांनी केली.

 

बातम्या आणखी आहेत...