आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना पक्षप्रमुखांचा राहुल गांधींच्या सुरात सूर, माेदींवर निशाणा, म्हणाले, चौकीदार चोर आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोहराबुद्दीनच्या हत्येच्या कटातील आरोपी निर्दोष सुटले, पण राममंदिर संबंधित खटले आजही सुरू
  • उद्धव ठाकरेंचे अावाहन तेलंगण, छत्तीसगडची पुनरावृत्ती महाराष्ट्रात व्हायला पाहिजे  जागावाटप गेले खड्ड्यात; अाधी कर्जे माफ करा : भाजपला ठणकावले 

पंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्यावर टीकास्त्र साेडताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साेमवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळला. एक किस्सा सांगताना ते म्हणाले, 'एका शेतकऱ्याने मला कीड लागलेले लिंबाचे झाड दाखवले. खरे तर लिंबाच्या झाडापासून कीटकनाशक तयार केले जाते, मात्र इथे तर लिंबाचे झाडच किडीने नष्ट केले हाेते. त्यावर मी त्या शेतकऱ्याला म्हणालाे अाजकाल चाैकीदारच चाेर बनलेत,' असे सांगत ठाकरेंनी माेदींना टाेला लगावला. राहुल गांधीही रफाल प्रकरणात नेहमीच माेदींचा उल्लेख 'चाैकीदार चाेर है' असा करतात. 

 

साेमवारी पंढरपूरमध्ये झालेल्या सभेत ते बाेलत हाेते. राज्यातील शेतकरी दुष्काळाने हाेरपळत असताना इतर राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागलेले अाहेत. अाम्ही मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत अाहाेत. जागावाटप गेले खड्ड्यात, अाधी शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजप सरकारला फटकारले. युतीचे काय करायचे याचा निर्णय जनताच घेईल, असे सांगतानाच तेलंगण, छत्तीसगडची पुनरावृत्ती महाराष्ट्रात व्हायला पाहिजे, असे अावाहन ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना उद्देशून केले. आम्ही आता सगळे काही जिंकले आहे अशा थाटात ते होते. तो समज या पाच राज्यांनी खोडून काढला. तेलंगणात तर प्रादेशिक पक्षांनी दाेन्ही राष्ट्रीय पक्षांना पराभूत केले, महाराष्ट्रामध्ये हेच होईल,' असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला. 

 

बाेला, तुम्हाला खरेच कर्जमाफी मिळाली का? 
'सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी खरंच काेणाकाेणाला मिळाली,' असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना केला. त्यावर सर्वांनी नकारार्थी उत्तर दिले. शेतकऱ्यांची कर्जे माफ झालेली नाहीत, पीक विमा मिळालेला नाही. धनगर अारक्षण, काेळी बांधवांचे प्रश्नही सुटलेले नाहीत. राज्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी ८ हजार काेटी देऊ असे माेदी म्हणाले, मात्र अजून पैसे अालेले नाहीत. ते जगभर फिरत आहेत, पण शेतकऱ्यांसाठी फिरायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्राची माती त्यांनी मस्तकी लावून घेतली असती तर शेतकऱ्यांचे कल्याण झाले असते, असा टाेलाही ठाकरेंनी लगावला. जानेवारीपासून अापण दुष्काळी भागाचा दाैरा करणार असल्याचे ते म्हणाले. 

 

राममंदिर बांधणारच : उद्धव ठाकरे 

राममंदिराचा मुद्दा मी मुद्दामच हाती घेतला. या प्रकरणात मला भंडाफोडच करायचा आहे. बाबरी पाडून ३० वर्षे झाली, पण राममंदिराचा विषय काही सोडवता आला नाही. बाबरी पाडून त्यांना गादी मिळाली. आज त्याच गादीवर ते कुंभकर्णासारखे लोळत आहेत. म्हणूनच त्यांना जागे करण्यासाठी मी अयाेध्येत गेलाे, पंढरपूरमध्ये अालाेय. त्यांना विचारताेय, राममंदिर कधी बांधणार? ते बांधणार नसतील तर अाम्ही बांधू, असे उद्धव म्हणाले. 

 

नितीशकुमारांनी भूमिका स्पष्ट करावी : मी भाजप किंवा एनडीएचा विराेधक नाही. युती करायची की नाही हे ते जनता ठरवेल, आम्ही काय ते ठरवले आहे. पण आज तो विषय नाही. बिहारमधील जागावाटपात नितीशकुमारांपुढे भाजप झुकला. जे नितीशकुमार संघमुक्त भारत करायला निघाले हाेेतेे त्यांच्यासाेबत भाजप जात अाहे. हिंदुत्व आणि राममंदिराच्या मुद्द्यावर नितीश व पासवान यांची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करायला हवे, असेही ठाकरे यांनी म्हटले. 

 

शिवसेनेमुळे राममंदिर झाल्यास गैर काय : पाटील 
बार्शी | 'राममंदिर उभारले पाहिजे हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या माध्यमातून झाले तर गैर काय ? शेवटी मंदिर होणे गरजेचे आहे,' अशी भावना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 'युती व्हावी यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. शेवटी जे ठरेल ते होईल. भाजपचा पाया भक्कम आहे. त्यामुळे अामचा पक्ष बॅकफूटवर कधीही जाणार नाही. सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीला अाघाडीशिवाय पर्याय नाही. तसे झाल्यास राष्ट्रवादीला जादा फटका बसेल, असे ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...