आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराघरात जाऊन भाजप सरकारचे अपयश लक्षात आणून द्या, बीड जिल्हा भगवा करा, उद्धव ठाकरेंचा कानमंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जिल्ह्यात गोपीनाथ मुंडेंमुळे बाळासाहेब ठाकरेंनी विधानसभेच्या सहापैकी पाच जागा भाजपला सोडल्या होत्या. मात्र आता शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी बीडवर भगवा फडकवून सर्वच जागा निवडून द्याव्यात. खोटी आश्वासने देऊन आणि हजारो कोटींच्या जाहिराती करून भाजप सरकार सर्वसामान्यांशी जुमलेबाजी करत आहे.

 

शिवसैनिकांनी, बूथ प्रमुखांनी घराघरात जाऊन भाजप सरकारचे अपयश नागरिकांच्या लक्षात आणून द्यावे व भाजपच्या जाहिरातबाजीचा खरा चेहरा समोर आणवा, असा कानमंत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या जिल्ह्यातील बुथप्रमुखांना दिला.    

 
जिल्ह्यातील शिवसेनेच्या बूथ प्रमुख गटप्रमुखांचा मेळावा शहरातील रामकृष्ण लॉन्सवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी पार पडला. व्यासपीठावर खासदार चंद्रकांत खैरे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, मिलिंद नार्वेकर, संपर्कप्रमुख सुधीर मोरे, प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे, संपदा गडकरी, गोविंद घोळवे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे, माजी जिल्हाप्रमुख  बाळासाहेब पिंगळे, अनिल जगताप यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील  सहाही मतदारसंघातून तीन हजारांवर बूथप्रमुख व शिवसैनिक या मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी श्रीराम मंदिर उभारणी, राष्ट्रीय राजकारण, राज्यातील दुष्काळी स्थिती या मुद्यांवर मते मांडली. शिवाय, जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाटचालीवरही त्यांनी मत मांडून बूथ प्रमुखांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे  म्हणाले, गोपीनाथजी  मुंडे व प्रमोद महाजनांवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे प्रेम होते म्हणून त्यांच्यासाठी एक एक करत जिल्ह्यातील पाच जागा भाजपला सोडल्या. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. राज्यात सेनेची एकहाती सत्ता येऊन सेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी बीडकरांनीही साथ द्यावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व जागा शिवसेनेच्या निवडून आणाव्यात. गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक या सूत्राप्रमाणे काम यापुढे जिल्ह्यात शिवसेनेने करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.  

 

...तरच लोक सेनेला मत देतील  
भाजप सरकार केवळ जुमलेबाजी करत असून अनेक योजना राबवल्याचे सांगत आहे. प्रत्यक्षात मात्र अनेक जणांना कोणत्याही याेजनेचा लाभ मिळाला नाही. मात्र सरकारकडून जाहिरातबाजीवर हजारो कोटी रुपये खर्च केला जातो. बूथ पातळीवर शिवसैनिकांनी घराघरात जाऊन अशा जाहीरातबाज योजनांचा सर्व्हे करावा, भाजप सरकारचे अपयश लोकांच्या लक्षात आणून द्यावे, आपल्या योजनेतून गावातील किती जणांना लाभ मिळाला याची बॅनर लावावेत म्हणजे सरकारचा खोटा चेहरा समोर येईल हा खोटा चेहरा समोर आणण्याचे काम शिवसैनिकांनी केले तर निवडणुकांमध्ये प्रचारही करण्याची आवश्यकता लागणार नाही लोकच शिवसेनेला मतं देतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.    
 
तळागाळापर्यंत शिवसेना पोहोचवा   
जिल्ह्यात शेवटच्या स्तरातील माणसापर्यंत शिवसेना पोहोचवा. सामान्य नागरिक व पक्ष यांच्यामधील दुवा म्हणजे बूथ प्रमुख आहेत. जे बूथ प्रमुख करू शकतात ते मी सुद्धा करू शकत नाही. मी केवळ पक्ष चालवू शकतो. मात्र सामान्य माणसांचं जाळ विणून पक्षामागे ताकद उभी करण्याचं काम, पक्ष तळागाळात पोहोचवण्याचे काम बूथ प्रमुख व शिवसैनिक करतो असे उद्धव म्हणाले. या वेळी   लोकसभा संपर्क प्रमुख  विलास महाराज शिंदे  अॅड चंद्रकांत नवले, उपजिल्हा प्रमुख  संजय महाद्वार बाळासाहेब अंबुरे  युद्धाजित पंडित   यांच्यासह तालुकाप्रमुखांची व शिवसैनिकांची उपस्थिती होती.   
 
.. तर पैसा गेला कुठे ?  
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, मी जिथे जातो तिथे विचारताे तर मला कुठेही कर्जमाफी मिळालेले शेतकरी भेटत नाहीत. आतही इथे किती  शेतकरी आहेत, त्या पैकी किती जणांना कर्जमाफी मिळाली त्यांनी हात वर करा असे उद्धव ठाकरे  म्हणाले. मात्र कुणाचेच हात वर झाले नाही. यावर जर कर्जमाफी मिळाली नाही तर पैसा गेला कुठे असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. माझ्या सभेत एकही हात वर येत नाही. मग असल्या कुचकामी योजना काय करायच्या आहेत. त्यामुळे ठाकरे यांनी शेतकऱ्यांनी वज्रमूठ करून हात वर करायला सांगितले. या वज्रमुठीतील भगवा निश्चितच देशात लोकसभेवर फडकेल, असा विश्वास ठाकरे यांनी व्यक्त केला.   
 
सरकारचा विरोधक नाही, मात्र जनतेच्या बाजूचा
मी सरकारचा विरोधक नाही मात्र मी जनतेच्या बाजूचा आहे. जनतेचे मत हे सरकारच्या विरोधात असेल तर त्याला माझा नाइलाज आहे. मात्र मी जनतेची बाजू मांडत राहणार. मला तुम्हाला चांगलं सरकार द्यायचं आहे यासाठी सत्ता मागत असल्याचे ठाकरे या वेळी म्हणाले.   
 
गोपीनाथजी, महाजनांची आठवण   
आम्ही कोरड्या मनाने राजकारण करणारे नाही. २५ वर्षांच्या युतीच्या काळात गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांच्याशी नातं निर्माण झालं तो ओलावा आजही कायम आहे. बीडमध्ये आल्यावर त्यांची आठवण होते. हिंदू म्हणून लोक मतदान करतील व हिंदूंचे सरकार येईल, असे बाळासाहेब हे महाजनांना म्हणाले होते तसे हे सरकार आले आहे. मात्र त्यांची कार्यशैली चुकीची असल्याची टीकाही त्यांनी केली.   
 
मराठवाड्यात 40 आमदार होतील   
मेळाव्याचे प्रास्ताविक खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत. शिवसैनिकांनी जोमाने काम केल्यास मराठवाड्यात 40 जागा विजयी करण्याची ताकद शिवसेनेत असल्याचे खैरे म्हणाले. मराठवाड्यासाठी दीडशे टीएमसी पाण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.   
 
आवाज येत नाही ... माइकवाला गेला कुठे    
शिवसेनेच्या बूथ प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिले, तेव्हा माइकमधून त्यांचा शिवसैनिकापर्यंत आवाज जात नव्हता. तेव्हा शिवसैनिकांनी उभे राहून आवाज येत नाही.. आवाज येत नाही  असे सांगितले. तेंव्हा ठाकरे यांनी अरे माइकवाला गेला कुठे... अशी विचारणा केली. माइकवाल्याने आवाज वाढवल्यानंतर ठाकरे यांनी आता तुमच्यापर्यंत आवाज येतो का अशी विचारणा केली तेव्हा शिवसैनिक हो म्हणाले.. शिवसेनेच्या व्यासपीठावर प्रभू रामचंद्राची मूर्ती दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...