एक फोन कॉल अन् 'भारत बंद'मधून शिवसेनेची माघार, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात लावले होते पोस्टर
'भारत बंद'मधून ऐनवेळी माघार घेवून शिवसेनेने सगळ्यांना धक्का दिला आहे.
-
मुंबई/नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला महाराष्ट्रासह बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि कर्नाटकांत संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. भारत बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, 'भारत बंद'मधून ऐनवेळी माघार घेवून शिवसेनेने सगळ्यांना धक्का दिला आहे.
मुंबईत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे.
काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह दिल्लीत रस्त्यावर उतरले आहे. राहुल गांधी यांनी आंदोलनाच्या सुरुवातीला राजघाटवर जावून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शिवसेनेने एक दिवस आधी लावले होते पोस्टर
केंद्रात तसेच राज्यात शिवसेना, भाजपचा मित्र पक्ष आहे. असे असतानाही शनिवारी (8 सप्टेंबर) रात्री शिवसेनेने पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात पोस्टर लावले होते. मात्र, रविवारी रात्री शिवसेनेने भारत बंदमधून माघार घेवून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.सूत्रांनुसार, भाजपाध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून भारत बंदमध्ये सहभागी न होण्याची विनंती केली होती. यानंतर शिवसेनेने आपला स्टँड बदलल्याचे बोलले जात आहे.