आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदमसह 5 जण तडीपार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्‍या श्रीपाद छिंदम यांना जिल्हा प्रशासनाने ऐन महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच दणका दिला आहे. छिंदम यांच्यासह पाच जणांना निवडणुकीच्या कालावधीत शहरातून तडीपार केले आहे. ओंकार कराळे, केडगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष मनोज कराळे, भाऊसाहेब कराळे, माजी नगरसेवक दीपक खैरे यांना तडीपार करण्यात आले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चिथावणीखोरांना शहरातून तडीपार करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी जारी केले आहेत.

 

खासदार दिलीप गांधींना सशर्त मुभा..

खासदार दिलीप गांधी व माजी आमदार अनिल राठोड यांच्या चिरंजिवांना मात्र अटी व शर्तीवर शहरात राहाण्यास मुभा देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

661 जणांचे तडीपार प्रस्ताव..

महापालिका निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात व्हावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरातील भांडखोर व्यक्‍तींना निवडणुकीच्या काळात शहराबाहेर तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

शहरातील तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलिस ठाण्यांकडून जवळपास 661 जणांचे तडीपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे दाखल करण्यात आले होते.

 

पोलिस ठाण्यांकडून आलेल्या प्रस्तावात आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, दादाभाऊ कळमकर, सुवेंद्र गांधी, विक्रम राठोड, नरेंद्र कुलकर्णी, माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर आदी मातब्बर व्यक्‍तींचा समावेश होता.

 

आमदार कर्डिले व आमदार जगताप पिता-पुत्रांना तडीपारीतून वगळले..

आमदार कर्डिले व आमदार जगताप पिता-पुत्रांना विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित राहाता यावे, म्हणून तडीपारीच्या कारवाईतून वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, माजी आमदार राठोड व दादाभाऊ कळमकर यांनी आजारी असल्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र सादर केले आहे.

 

ऐन शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छ‍िंदम यांचे आक्षेपार्ह वक्तव्य..

दरम्यान, ऐन शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात श्रीपाद छिंदम यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याचे नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते.

बातम्या आणखी आहेत...