आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपुड्यातील पाझर तलावांतून गाळ काढण्याचा मुद्दा कॅबिनेटमध्ये मांडणार; महादेव जानकर यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- सातपुड्यातील पाझर तलाव, धरणातून गाळ काढताना वन विभागाची आडकाठी येते. मंगळवारी (दि.३०) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री व वन मंत्र्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू. यावलमध्ये दुष्काळी स्थिती असल्याने प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या मुख्यालयी थांबावे. आदेश न पाळणाऱ्यांनी कारवाईला तयार राहावे. वीज वितरण कंपनीने थकबाकी असलेल्या कोणत्याही शेतकऱ्यांचे कनेक्शन कापू नये, असे आदेश राज्याचे पशुसंवर्धन व मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी यावलमध्ये दिले. सोमवारी येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

 

सोमवारी दुपारी ३ वाजता दुष्काळ आढावा बैठकीला सुरुवात झाली. मंत्री महादेव जानकर यांच्यासह आमदार हरिभाऊ जावळे, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती उमाकांत पाटील, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे, रवींद्र पाटील, सविता भालेराव उपस्थित होते.

 

तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुक्याची माहिती दिली. यानंतर मंत्री जानकर यांनी विविध विभाग प्रमुखांशी संवाद साधला. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून सूचना व शासन-प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा जाणून घेतल्या. त्यात वनविभागाच्या हद्दीत असल्याने सातपुड्यातील पाझर तलाव, धरणांमधील गाळ काढता येत नाही, असा मुद्दा समोर आला. मंगळवारी कॅबिनेट बैठकीत हा मुद्दा मांडून निर्णय घेऊ, असे जानकर म्हणाले. तसेच पशु संवर्धन विभागाच्या योजनांची माहिती दिली. यानंतर त्यांच्या विभागाच्या तालुक्यातील रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले. आढावा बैठकीनंतर मंत्री जानकर यांनी तालुक्यातील हिंगोणा, हंबर्डी, आमोदा, पिंपरूळ, भोरटेक, अकलूद शिवारात पीक स्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी स्वत: साधत सरकार सोबत असल्याचे आश्वासन दिले.

 

दिशाभूल करू नका
यावल तालुकाच नव्हे, संपूर्ण मतदार संघात विदारक स्थिती आहे. अधिकारी वर्गाने स्वत:ला वाचवण्यासाठी कशीही आकडेवारी सांगून शासनाची दिशाभूल करू नये, असे शब्दात आमदार हरिभाऊ जावळे यांनी बैठकीत खडसावले. शासनाकडे मलाही भांडावे लागणार आहे. मात्र, आता 'महादेव'च आले असल्याने चिंता नाही, असे त्यांनी सांगताच हशा पिकला.

 

अपेक्षा, सूचना व तक्रारी
उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी सिंचन विभागाच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचला. पंचायत समितीचे उपसभापती उमाकांत पाटील यांनी शासनाकडून कूपनलिका करण्यास 200 फूट परवानगी असते. मात्र, पाणी 600 फुटांवर लागते. त्यामुळे नियमात सुधारणेची मागणी केली. कृषिभूषण नारायण चौधरी यांनी सातपुड्यातील तलावांची सद्यस्थिती मांडून त्यांच्या दुरुस्तीची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी पाण्याअभावी यंदा लागवड झालेली निम्मी केळी उपटून फेकायची वेळ आल्याचे सांगितले. प्रभाकर सोनवणे यांनी शेळगाव बॅरेज लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आग्रह धरला. पंचायत समिती गटनेते दीपक पाटील यांनी ग्रामीण पाणीपुरवठा, तर दहिगावचे उपसरपंच देविदास पाटील यांनी वेळेवर रोहित्र मिळावे, अशी सूचना मांडली.

 

बातम्या आणखी आहेत...