शिक्षकांची यंदाही 'काळी / शिक्षकांची यंदाही 'काळी दिवाळी'; दिवाळी मागण्यासाठी शिक्षक धडकले तावडेंच्या बंगल्यावर

विशेष प्रतिनिधी

Nov 06,2018 07:42:00 PM IST
मुंबई- रत्नागिरी, पालघर, विरार, नालासोपारा, नवी मुंबई, पनवेल येथून आपल्या घरून पहाटे निघालेल्या शेकडो शिक्षकांनी मंगळवारी सकाळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या मलबार हिल येथील शासकीय बंगल्यावर दिवाळी मागण्यासाठी धडक दिली. शिक्षकांचे आंदोलन बंगल्यावर धडकणार असल्याने मंत्रिमहोदय घरी नव्हते. त्यामुळे शिक्षकांनी काळी दिवाळी साजरी करत शिक्षणमंत्र्यांचा जोरदार निषेध केला.


गेली दोन वर्षे काळी दिवाळी साजरी करत राज्यातील शिक्षक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा निषेध नोंदवत आहेत. यंदा त्याची पुनरावृत्ती झाली. राज्याच्या अनेक भागांत विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे शिक्षकांनी मंगळवारी काळी दिवाळी साजरी केल्याची माहिती समितीचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी दिली.

रेडीज म्हणाले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अंगणवाडी सेविकांना, परिवहनमंत्री दिवाकर रावते एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देऊ शकतात. मग शिक्षणमंत्री शिक्षकांना दोन वेळा पोटभर अन्न मिळण्याइतपत पगारसुद्धा देऊ शकत नाहीत, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

मंत्र्यांचा शिक्षकांना गुंगारा
गेल्या चार वर्षांत शिक्षणमंत्र्यांनी कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचे अनेक प्रश्न अर्धवट सोडले आहेत. त्याचा निषेध म्हणून आम्ही काळी दिवाळी साजरी केली. आम्ही काळ्या दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री तावडे यांना शोधले, विलेपार्ले येथील त्यांच्या खासगी निवासस्थानीसुद्धा गेलो; पण ते कुठेच सापडले नाहीत, असे रेडीज म्हणाले. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये शिक्षकांनी काळी दिवाळी साजरी केली. त्यात अनुदानित, विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, संस्थाचालकांचा समावेश असल्याचाे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

X
COMMENT