आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये वाल्याच्या टोळ्याच; नगरसेविकेच्या मुलाकडून माझ्या हत्येचा कट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भाजपचे अामदार अनिल गाेटे यांचे काही दिवसांपासून स्वपक्षीय नेत्यांशी बिनसले अाहे. यातूनच ‘धुळ्यातील भाजपच्या नगरसेविका प्रतिभा चौधरी यांच्या मोठ्या मुलाने आपल्या हत्येचा प्रयत्न केला असून याबाबत पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करूनही काहीही झालेले नाही,’ असा खळबळजनक अाराेप त्यांनी बुधवारी केला. इतकेच नव्हे, ‘भाजपमध्ये वाल्याचा वाल्मीकी केला जातो असे म्हणतात, परंतु धुळ्यात तर वाल्याच्या टोळ्याच भाजपने घेतल्या आहेत.

 

एखादा आमदार आणि त्याची पत्नीच सुरक्षित नसतील तर सामान्य जनता कशी सुरक्षित असेल?’ असा सवालही त्यांनी विधानसभेत केला. या गंभीर अाराेपाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहात दिले.   


महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात भाजपमध्ये दाेन गट पडले अाहेत. केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पर्यटन मंत्री जयप्रकाश रावल यांनी स्थानिक भाजप अामदार अनिल गाेटेंना डावलण्याचा प्रयत्न केल्याने ते नाराज अाहेत. यातूनच गाेटेंनी अापले स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उतरवले अाहे. यातून तिन्ही मंत्री व गाेटे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून अाराेप- प्रत्याराेपांची मालिकाच सुरू झाली अाहे.  


विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे गाेटे यांनी अापल्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र, सुरुवातीला अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी त्यांना या विषयावर बाेलू दिले नाही, त्यामुळे गाेटेंनी मोकळ्या जागेत ठिय्या मांडला होता. त्यांची समजूत काढल्यानंतर ते जागेवर गेले आणि अध्यक्षांनी बोलायला परवानगी दिल्यानंतर त्यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले.  माझ्या हत्येची हत्येची सुपारी दिल्याची माहिती भाजप नेत्यांना होती. तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांना तीन वेळा पत्र लिहून माहितीही दिली, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, असा अाराेपही गाेटेंनी केला.   


विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अनिल गोटे यांनी मांडलेला विषय गंभीर असल्याचे म्हटले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.  


चाैधरींकडून अाराेपांचे खंडन
अामदार गाेटेंच्या अाराेपाचे प्रतिभा चौधरी यांचे पुत्र अमोल यांनी खंडन केले अाहे. ‘ज्या व्हीडिअाे क्लीपचा अाधार घेऊन गाेटे अाराेप करत अाहेत त्या क्लिपमधील आवाज माझा नाही. त्यात दिलेली माहिती खोटी व चुकीची आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये’, असे आवाहन चौधरी यांनी केले.

 

धुळ्यात भाजपचे ६२ उमेदवार, पैकी पाचच मूळचे पक्षातील, इतर २८ गुंड, त्यांच्यावरही गंभीर गुन्हे 

 

अनिल गोटे म्हणाले, माझ्या पत्नीबद्दल अश्लील मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी त्याची जामिनावर सुटका झाली. विशेष म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्याचा सत्कार करत त्याला पक्षात घेतले. पक्षाला अापली किंमत नाही, परंतु फार कमी जणांना ठाऊक आहे की, माझ्या पत्नीच्या आईने भाजपला मुंबईतील वसंत स्मृती येथे कार्यालय घेण्यासाठी पैसे दिले होते. आज धुळ्यात महापालिका निवडणुकीला उभे असलेल्या ६२ पैकी फक्त ५ जण मूळचे भाजपचे आहेत, बाकी सगळे दुसऱ्या पक्षातून आयात केलेले गुंड आहेत. यापैकी २८ गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

 

बातम्या आणखी आहेत...