नाशिक: शेत मालाचे / नाशिक: शेत मालाचे कोसळणारे दर आणि कर्जाचा वाढता डोंगर..बागलाणच्या दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या

  • शासनाचे शेतीविषयी असलेले चुकीचे धोरण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार

Dec 08,2018 06:22:00 PM IST

जायखेडा- तीव्र दुष्काळ, घटत चाललेले उत्पन्न, शेत मालाचे कोसळले बाजार भाव व कर्जाचा वाढता डोंगर या आपत्तींनी त्रस्त झालेल्या बागलाण तालुक्यात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली.

बागलाण तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार (वय-44) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. तर सारदे (ता.बागलाण) येथील शेतकरी मनोज रामराव धोंडगे (वय- 33) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शासनाचे शेतीविषयी असलेले चुकीचे धोरण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना जबाबदार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.


कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने थकीत कर्ज कसे फेडावे विवंचनेतून भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी गुरुवारी (दि.6) आपल्याच कांदा चाळीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बँकेचे व उसनवारीचे कर्ज होते. कांद्याच्या भाव वाढीच्या आशेवर त्यांनी जवळपास चारशे क्विंटल कांदे चाळीत साठवून ठेवले होते. मात्र भाव वाढ होत नसल्याने कर्ज कशे फेडावे या विवंचनेत ते होते. अखेरीस नैराश्यातुन त्यांनी आपली जीवन यात्रा संपविल्याचे बोलले जात आहे.

बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले यांनी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तात्याभाऊ खैरनार यांच्या पाश्चात्य आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोरख गर्दे करीत आहेत.


सारदे येथील तरूण शेतकरी मनोज रामराव धोंडगे यांनी शुक्रवारी (दि 7) रोजी आपल्या शेतात विष प्राशन केले. नातेवाईकानी त्यांना तातडीने मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या वर्षी त्यांची पत्नी व मुलाचे निधन झाले होते. पाण्याच्या नियोजनासाठी शेततळे तयार करून त्यांनी डाळिंब व कांदा पिकांची लागवड केली होती. त्यांच्या जमिनीवर बँक ऑफ महाराष्ट्राचा 21 लाखांचा कर्जाचा बोजा असल्याचे समजते. हा बोजा कमी करून कर्ज कसे फेडावे या विवंचनेने त्यांना ग्रासले होते. अखेर नैराश्यातुन त्यांनी आपली जीवन यात्रा संपविल्याचे बोलले जात आहे. त्यांचा पश्चात 6 वर्षांची मुलगी आहे.

X