आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या प्राध्यापकांना अटक आणि जामिनावर मुक्तताही, पोलिसांच्या भूमिकेवर संशय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- बारावीत उत्तीर्ण करण्यासाठी शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनीने केल्यानंतर पंचवटी महाविद्यालयातील सचिन निशिकांत सोनवणे व प्रवीण दादाजी सूर्यवंशी या प्राध्यापकांविरुद्ध आडगाव पोलिसांनी तत्काळ विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

 

आरोपींना कोर्टात हजर केले असता दोघांना कोठडी सुनावली आणि त्यानंतर जामिनावर मुक्तता केली. दरम्यान, संबंधित प्राध्यापकांच्या चौकशीसाठी पंचवटी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून समिती नियुक्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराने विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. संबंधित प्राध्यापकांविरुद्ध संस्थेने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

 

आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने 2015 मध्ये महाविद्यालयात अकरावीला वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी बारावीत असताना संशयित प्रा. सोनवणे व प्रा. सूर्यवंशी यांनी वर्गात विद्यार्थ्यांना करिअरबाबत चिठ्ठीत लिहून देण्यास सांगितले. त्यावेळी दोघा प्राध्यापकांनी हाताला आक्षेपार्ह स्पर्श करीत लज्जा निर्माण होईल अशी वर्तणूक केली. या प्रकारामुळे पीडितेला मानसिक धक्का बसल्याने 2016 पासून तिची महाविद्यालयात जाण्याची मानसिकताच होत नव्हती. त्यामुळे ती वारंवार बारावीमध्ये नापास होत होती. मंगळवारी (दि.18) दोघांनी पीडितेची पुन्हा भेट घेत, त्यापूर्वी केलेल्या शारीरिक संबंधाच्या मागणीची आठवण करून दिली. 'आम्ही दिलेल्या प्रपोजलचा विचार केला की नाही?' असा प्रश्न विचारून तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. तिने घरी जाऊन घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर तातडीने वडिलांनी पीडितेसह पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन केला. वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ दोघा प्राध्यापकांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत अटक केली.

 

विद्यार्थ्यांमध्ये संताप, पोलिसांच्या भूमिकेवर संशय
पंचवटी महाविद्यालयात घडलेल्या या प्रकाराने विद्यार्थिनींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. संबंधित प्राध्यापकांविरुद्ध संस्थेने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आडगाव पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत प्राध्यापकांना अटक केल्याच्या कारवाईबद्दल कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. मात्र, न्यायालयात हजर करताच दोघांना जामीन झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी जामिनास जोरदार विरोध केला असता तर संशयितांना पोलिस कोठडी अथवा त्यांची कारागृहात रवानगी झाली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...