आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा सस्पेन्स कायम...मुख्यमंत्री-उद्धव यांची संयुक्त पत्रकार परिषदेला बगल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महापौर बंगल्यात प्रस्तावित असलेल्या स्मारकासंदर्भात एक शब्दही न बोलता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शनिवारी अभिवादन करून गेले. महापौर बंगल्यात होणारी उद्धव-मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद यंदा झाली नाही. त्यामुळे शिवसैनिकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून आले. शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभरातून मोठी गर्दी केली होती. त्यात शिवसेना नेते होतेच, पण काँग्रेसचे भाई जगताप, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, सुरेश प्रभू, भाजप खासदार पूनम महाजन, भाजप आमदार भाई गिरकर उपस्थित होते. 


मुख्यमंत्री आले तेव्हा उद्धव ठाकरे हे जवळ असलेल्या महापौर बंगल्यात होते. मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे उद्धव यांना भेटले. दोघांमध्ये पंधरा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिवाजी पार्कवर आले व त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून बाळासाहेबांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. 
मुख्यमंत्र्यांचे शिवाजी पार्कवर आगमन होताच उपस्थित शिवसैनिकांनी 'एकच साहेब बाळासाहेब' अशा घोषणा जोरजोरात देण्यास सुरुवात केली. तेव्हा उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी हात उंचावून शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी मुख्यमंत्री २०१५ पासून नेमाने शिवाजी पार्कवर येतात. उद्धव आणि ते संयुक्तपणे पत्रकारांना सामोरे जातात. यंदा मात्र तसे घडले नाही. युतीत सध्या तणाव आहे. राम मंदिराच्या उभारणीसंदर्भात उद्धव पुढच्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे स्मारकासंदर्भातील आजचे मौन शिवसैनिकांचा हिरमोड करणारे ठरले. 

 

बातम्या आणखी आहेत...