भाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केले काय; उद्धव ठाकरे यांची राम कदम यांच्यावर कडाडून टीका
भाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केले काय; असा सवाल उपस्थित करून उद्धव ठाकरे यांची राम कदम यांच्यावर कडाडून टीका केली.
-
मुंबई- 'मुलीने विरोध केला तरीही तिला पळवून आणून तुम्हाला देणार', असे महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्यावर चहुबाजुंनी टीका होत आहे.
राम कदम यांनी दहीहंडीच्या उत्सवादरम्यान बेताल वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाजप आमदार राम कदम यांच्या वक्तव्याप्रकरणी जोरदार हल्ला चढवला.
भाजपने 'बेटी भगाओ' अभियान सुरु केले काय; असा सवाल उपस्थित करून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची राम कदम यांच्यावर कडाडून टीका केली. माता-बहिणींचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धाडस दाखवा, राम कदमांवर कारवाई करा, अशी मागणीही उद्धव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप आमदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. प्रशांत परिचारिक, श्रीपाद छिंदम असेल किंवा राम कदम असतील, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. एवढेच नाही तर यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये.
हार्दिक पटेल यांना शिवसेनेचा पाठिंबा
गुजरातमध्ये पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांचे आरक्षणासाठी मागील 12 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. आपण या उपोषणाला पाठिंबा दर्शविल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले. 'तुझ्यासारख्या लढवय्यांची गरज आहे, त्यामुळे उपोषण मागे घेण्याची विनंती केली', असे पटेल यांना फोन करून सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.सातार्यात शिक्षणमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी घेरले
दुसरीकडे, राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा फटका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना बसला आहे. सातार्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिलांनी विनोद तावडे यांना घेरले. यावेळी महिलांकडून राम कदम यांच्या निलंबनाची मागणी केली. तसेच कदम यांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, असेही म्हटले.