आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम मंदिरावरून उद्धव ठाकरेंची कोलांटउडी.. आधी म्हणाले,..तर मंदिर आम्ही बांधू, आता म्हणतात, कायदा करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड/लातूर- यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान करत अयोध्येत राममंदिर तुम्ही बांधताय की आम्ही बांधू, असा सज्जड सवाल मोदी सरकारला केला होता. मात्र त्याच्या पाचच दिवसांत उद्धव यांनी आपली भूमिका चक्क बदलली. मंगळवारी बीड व लातुरातील शिवसेनेच्या गटप्रमुख, बुथप्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलताना 'राम मंदिरासाठी कायदा अस्तित्वात आणा' अशी मागणी त्यांनी मोदी सरकारकडे केली. आपण येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येला जात असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला.


बीडमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, आज राम मंदिराची सुनावणी कोर्टात सुरू आहे. निकाल कधी लागणार आहे? कारण पिढ्या न पिढ्या निकालाच्या प्रतीक्षेत जात अाहेत. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. तीन तलाक, अॅट्रॉसिटीसारखे  निर्णय तुम्ही बदलले. कायदा केला. त्याचप्रमाणे राम मंदिरासाठी कायदा अस्तित्वात आणा. सरकार म्हणून तुम्हाला निर्णय घ्यावयाचे आहेत. "मंदिर वही बनायेंगे' ही जुमलेबाजीच होती.  या पापात मी सहभागी होणार नाही. माझ्या वडिलांनी मला खोटे बोलायला शिकवले नाही, असे उद्धव म्हणाले.
 लातुरात उद्धव म्हणाले, अयोध्येतल्या राम मंदिराचाही मुद्दा आजही न्यायालयात आहे. उद्या न्यायालयाने मंदीर बांधण्याची परवानगी दिली नाही तर तुम्ही काय करणार?
 
ते मंदीर काय बांधणार : अजित पवार
वडीगोद्री (ता. अंबड) - माझ्याकडून बोलताना चूक झाली, त्याची मी माफीही मागितली. मात्र जे पाच वर्षात वडिलांचे स्मारक बांधू शकले नाहीत ते अयोध्येत जाऊन काय दिवे लावणार असा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ज्यांना शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारता आले नाही ते आता 25 तारखेला अयोध्येत जात आहेत. त्यांनी अगोदर वडिलांचे स्मारक बांधावे नंतर राम मंदिराचे बघावे.

 

बातम्या आणखी आहेत...