आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तनुश्रीच्या तक्रारीची दखल... नाना पाटेकर, गणेश आचार्यांना महिला आयोगाने बजावली नोटिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. तनुश्रीने सोमवारी तक्रार दाखल केल्यानंतर आयोगाने अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दिकी आणि राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे.   

 

‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी रोज नवे खुलासे होत असून वेगवान घडामोडी घडत आहेत. पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तनुश्रीने सोमवारी वकील अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत या प्रकरणाची लेखी तक्रार राज्य महिला आयोगाकडेही केली होती. आयोगाने तातडीने कारवाई करत नाना पाटेकरांसह तिघांना नोटीस बजावली. येत्या दहा दिवसांत आयोगासमोर प्रत्यक्ष हजर राहून किंवा लेखी खुलासा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तनुश्रीने वकिलामार्फत तक्रार केल्याने याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी तिने स्वत:ही उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्याचे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. 

 

पोलिसांकडूनही मागवली कारवाईची माहिती  
मुंबई पोलिसांकडेही या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे तनुश्रीने आयोगाला सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली, अशी विचारणा आयोगाने मुंबई पोलिसांकडेही केली आहे. पोलिसांनी त्याबाबतचा अहवाल 10 दिवसांत सादर करावयाचा आहे. 

 

चित्रपट संघटनांना निर्देश  
सिनेसृष्टीतील अशा घटना रोखण्यासाठी निर्माते, दिग्दर्शक, सिनेकलाकारांच्या संघटनांनाही आयोगाने काही सूचना केल्या आहेत. सिनेसृष्टीत काम करणाऱ्या महिलांबाबत होणारे गैरप्रकार रोखण्यास तसेच तक्रार करण्यासाठी एखादी यंत्रणा असणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण रोखण्यासाठी असलेला लैंगिक शोषण प्रतिबंध कायदा, 2013 या कायद्यानुसार सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनने तत्काळ अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे निर्देशही दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...