आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: मिनिटभरही तिथे असते तर...कुणाचे मुंडके बाहेर लटकत होते, तर कुणाचा हातच हलताना दिसत होता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परळ आणि एलफिन्स्टन रोड स्टेशनला जोडणार्‍या पादचारी पुलावर 23 सप्टेंबर 2017 रोजी भीषण चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेला वर्ष पूर्ण झाले आहे. या घटनेत 23 जणांचा मृत्यू झाला होता तर 37 लोक जखमी झाले. 'फुल पडले' या ऐवजी 'पूल पडला' अशी अफवा पसरल्याने गोंधळ उडाला आणि एलफिन्स्टन स्टेशनवरील फुटओव्हर ब्रिजवर चेंगराचेंगरीची भीषण घटना घडल्याचा असा दावा या दुर्घटनेत थोडक्यात बचावलेल्या शिल्पा विश्वकर्मा या विद्यार्थिनीने केला होता.


एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या अपघातात थोडक्यात बचावलेल्या स्नेहा चौरसिया या तरुणीने 'दिव्य मराठी'शी शेअर केलेला अत्यंत भीतीदायक प्रसंग शेअर केला होता. काय आहे तो प्रसंग जाणून घेऊन तिच्याच शब्दांत...

 

"मी तशी रोजच चेंबूरहून कांदिवलीला माझ्या ऑफिससाठी सकाळी आठ वाजता निघते. पण शुक्रवारी काही काम होते, म्हणून निघायला साडेनऊ वाजले होते. पावसाचे वातावरण होते. सायन येता-येता जोरात पाऊस सुरू झाला. मग 10.15 मिनिटांनी मी परळला उतरले. मला एल्फिन्स्टनहून चर्चगेटसाठी दुसरी ट्रेन पकडायची होती. पावसानेही चांगलाच जोर धरलेला होता. परळहून एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर येताना फूट ओव्हरब्रिजवर मी चढले तेव्हा तिथे अगोदर जाम गर्दी होती. हा ब्रिज, ही गर्दी तशी नेहमीचीच; पण या ठिकाणी गोंधळ उडाला तर काय होईल, हा विचार करून नेहमी पोटात गोळा येत होता, आणि ही भीती आज (23 सप्टेंबर 2017)खरी ठरली.

 

पावसापासून बचावासाठी बहुतांश लोक तिथे जमले होते. सर्वजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते. मुंबईत राहत असल्याने गर्दीची सवय आहे, पण त्या वेळी एवढी गर्दी होती की हातही हलवू शकत नव्हते. बॅगा कुठे जाताहेत...तर काही जणांचे मोबाइल गर्दीत कुठे-कुठे पडले होते. लोक एकमेकांना तुडवत होते. माझा पायही अनेक वेळा दबला...कशी बशी मोठ्या मुश्किलीने मी तिथून निघाले. लोक एकमेकांच्या पुढे निघण्याची जणू स्पर्धाच करत होते. कशीबशी मी निघाले...

 

एक मिनिटही झाला नाही तेवढ्यात मोठमोठ्या किंकाळ्या कानावर आदळल्या. मी तेव्हा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आले होते. तेथून मला सर्व दिसत होते. ज्या ब्रिजवर मी काही मिनिटांपूर्वी होते, तेथील दृश्य आता पूर्णपणे बदललेले होते. मी लोकांना एकामागून एक खाली पडताना पाहिले. खाली दबलेल्या लोकांची परवा न करता प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना तुडवून पुढे जात होता.

 

यादरम्यान जीव वाचवण्यासाठी लोक रेलिंगला लटकले आणि तिथून पडलेही. भयंकर दृश्य होते....ब्रिजवर खाली दबलेल्या लोकांपैकी कुणाचे मुंडके बाहेर लटकत होते, तर कुणाचा हातच हलताना दिसत होता.

 

गर्दीत दबून श्वास कोंडलेल्यांची ही शेवटची झटापट होती, जी मी फक्त पाहू शकत होते, इच्छा असूनही मला काही करता येत नव्हते. मी स्तब्ध झाले आणि फक्त रडत राहिले. आयुष्यात पहिल्यांदाच असा अपघात डोळ्यांदेखत पाहिला. येथून काही मिनिटांपूर्वीच मीही आले होते. जेव्हा मी ब्रिजवरून जात होते, तेव्हा मी एका महिलेला पाहिले होते पण नंतर मात्र ती दिसलीच नाही. ज्या काही महिला त्या गर्दीत वाचल्या त्या रक्ताने माखलेल्या होत्या. आपली बॅग, मोबाइल शोधत होत्या. पण त्या वेळी तेथे मोबाइलचे नेटवर्कही मिळत नव्हते."

 

मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे... आपल्या देशाला खरेच बुलेट, मेट्रोची गरज आहे का, की अगोदर या जुन्या, जीर्ण, जर्जर झालेल्या व्यवस्थेला सुधारण्याची गरज आहे? आज मी नशिबाने वाचले. काही मिनिटांमुळे वाचले, पण त्यांचा काय दोष होता जे सरकारच्या निष्काळजीपणाचा आज बळी ठरले आहेत?

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...