Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Zilha Parishad Schools are forced to show short film on PM Narendra Modi

नरेंद्र मोदींच्या जीवनावरील लघुपट 'चलो जीते है' विद्यार्थ्यांना दाखवा; ZP शाळांना आदेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 13, 2018, 12:11 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील लघुपट 'चलो जीते है' विद्यार्थ्यांना दाखविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांन

 • Zilha Parishad Schools are forced to show short film on PM Narendra Modi

  पापरी- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावरील लघुपट 'चलो जीते है' विद्यार्थ्यांना दाखविण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना देण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तालुका गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी प्राथमिक शिक्षकांना दिले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

  मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित लघुपट सक्तीने पाहावा लागणार आहे. मंगळवारी (18 सप्टेंबर) या 30 मिनिटांच्या लघुपटाचा "ज्यादा तास" विद्यार्थ्यांना करावा लागणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हा लघुपट पाहावा, यासाठी आवश्यक ती तयारी करावी, असे आदेश जिल्हा शासन स्तरावरून देण्यात आले आहेत. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना त्यांच्या वरिष्‍ठांकडून सोशल माध्यमातून हा आदेश फॉरवर्ड होत आहे.


  राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मंगेश हडवळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'चलो जीते हैं' हा लघुपट दिग्दर्शित केला आहे. या अर्ध्या तासाच्या लघुपटाचे प्रक्षेपण लाइव्ह स्ट्रिमिंगद्वारे केले जाणार आहे. 18 सप्टेंबर रोजी सकाळी दहा व दुपारी तीन वाजता या लघुपटाचे स्ट्रिमिंग केले जाईल. त्यासाठी सर्व शाळांनी तांत्रिक पूर्वतयारी करणे आवश्यक असून त्यासाठीच्या सूचनाही विभागातर्फे जारी करण्यात आल्या आहेत.

  लघुपट अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पाहावा, यासाठी सर्व शाळांनी या लघुपटाच्या प्रक्षेपणासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरची व्यवस्था करावी. त्याचबरोबर किमान एक एमबीपीएस वेग असलेले इंटरनेट जोडणी करावी. तसेच प्रोजेक्टर व स्क्रीन आणि स्पीकर्सची व्यवस्था करण्याच्या सुचना शाळांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर हा लघुपट लाइव्ह स्ट्रिमिंग केला जाणार असल्याने त्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सूचना देखील शाळांना देण्यात आलेल्या दिसत आहेत.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील लघुपट विद्यार्थ्यांना दाखवून, मोदींच्या संघर्षमय प्रवासाची व त्यातून गाठलेल्या यशाची एक नवीन प्रेरणा, धेय देण्याचा मानस शिक्षण विभागाचा आहे. त्यामुळे हा उपक्रम आयोजित केला असल्याचे समजते.

Trending