Drone / आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पिकावरील किडीला ओळखणार ड्रोन, स्वत:च कीटकनाशकाची फवारणीही करणार

5 लिटर पेट्रोलमध्ये 2 तास छायाचित्रे घेत फवारणी करू शकते

दिव्य मराठी

Jul 17,2019 12:58:00 PM IST

नवी दिल्ली - शेतात पिकावरील कीड आणि कीटकांच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी आयआयटी कानपूरने नवीन तंत्रज्ञान विकसित केले होते. शेतकऱ्यांना मदत करण्यासठी शास्त्रज्ञांनी अॅग्रो हेलिकॉप्टर ड्रोन तयार केले आहे. हे ड्रोन पीक कशामुळे खराब होत आहे हे ओळखून स्वत:च त्यावर कीटकनाशकाची (पेस्टिसाइड्स) फवारणी करण्यास सक्षम आहे. आयआयटीच्या एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाने या ड्रोनमध्ये मल्टिस्पेक्ट्रल कॅमेरे लावले आहेत. या माध्यमातून पिकांच्या आरोग्याचा आढावा घेत, रोग, कीड आणि पिकांच्या उत्पादन पातळीचा अंदाज घेता येईल. आयआयटी कानपूरमध्ये घेण्यात आलेली अॅग्रो हेलिकॉप्टर ड्रोनच्या मॉडेलची चाचणी यशस्वी झाली आहे. आता सरकारची मागणी आणि कृषी विभागाच्या गरजेनुसार या तंत्रज्ञानावर पुढे काम करण्यात येणार आहे.एअरोस्पेस इंजिनिअरिंग विभागाचे प्रोफेसर अभिषेक यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे पिकाचे होणारे नुकसान कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवता येणार आहे.


यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कीड आहे, केवळ त्याच जागेवर फवारणी करेल. रंग आणि आकारावरून हा किडीची ओळख पटवणार आहे. आवश्यकता भासल्यास या माध्यमातून पूर्ण शेतातही फवारणी करता येते. प्रोफेसर अभिषेक यांनी सांगितले की, ड्रोनवर रंग प्रतिबिंब पाहू शकणारे हायटेक कॅमेरे लावण्यात आल्याने कृषी क्षेत्रातील सर्वेक्षणाचे स्वरूपच बदलणार आहे. या ड्रोनमध्ये ४.४ किलो व्हॅटचे इंजिन लावलेले असल्याचे त्यांनी सांगितले. मोटरच्या माध्यमातून ड्रोनमध्ये लागलेले ब्लेड त्याला हवेत संतुलन राखण्यास मदत करतात. हे ड्रोन एका वेळी फवारणी करण्यासाठी दहा किलो कीटकनाशक (पेस्टिसाइड) घेऊन उडण्यास सक्षम आहे.


५ लिटर पेट्रोलमध्ये २ तास छायाचित्रे घेत फवारणी करू शकते
हे शेताची १० ते १५ फूट उंचीवरून फोटोग्राफी करून त्याची मोठी इमेज बनवते. यावरून शेतातील कोणत्या भागात कीड आहे किंवा पिकाचे आरोग्य कसे आहे याची माहिती मिळते. या ड्रोनमध्ये पाच लिटरचे पेट्रोल टँक लावलेले आहे. या इंधनावर हे दोन तास सलग उडून छायाचित्रे घेण्याबरोबरच फवारणी करू शकते. याआधी शेताची छायाचित्रे काढण्याचे काम केवळ सॅटेलाइटनेच करावे लागत होते.

X