आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलींच्या निवासी वसतिगृहातील खाद्यपदार्थांत आढळले कीटक

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वैतागलेल्या विद्यार्थिनीने गाठले तहसील कार्यालय
  • सोयी-सुविधांच्या पाहणीचे तहसीलदारांचे आश्वासन

​​​​​​वैजापूर : मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात निवासी विद्यार्थिनींना कंत्राटदारामार्फत पुरवठा करण्यात येत असलेल्या आहारात कीटक सापडल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनींच्या जमावाने तहसीलदारांचे दालन गाठून वसतिगृहात निवासी विद्यार्थिनींना पुरवण्यात येत असलेल्या गुणवत्ताशून्य अन्नाचे नमुने दाखवले. दरम्यान, या प्रकाराची तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी दखल घेऊन मंगळवारी वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थिनींना मिळणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुलींनी त्यांचे दालन सोडले.

मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी असलेल्या शासकीय वसतिगृहात ७२ मुली वास्तव्यास आहेत. सोमवारी त्यांना भोजनासाठी दिलेल्या अन्नात मोठ्या प्रमाणावर कीटक आढळून आल्या. हा प्रकार नित्याचाच झाल्याने दाद मागण्यासाठी त्या एकजुटीने तीन किलोमीटर पायी चालत जाऊन तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्यासमोर त्यांनी पुरवठादार कशा प्रकारे अपायकारक अन्न पुरवून आमच्या आरोग्याशी खेळत असल्याचा पुरावा सादर केला. वसतिगृहात शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचा लाभ मिळत नाही. जेवणात कधी खडे तर कधी अळ्या आढळून येतात. वसतिगृह अधीक्षक सुजाता लासुरे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. काही दिवसांपासून रोजच हा प्रकार होत असल्याने पुन्हा वसतिगृह अधीक्षक यांच्या लक्षात आणून देण्यासाठी गेलो असता त्यांची बदली झाल्याने हा प्रकार तुमच्यापर्यंत आल्याचे मुलींनी तहसीलदारांना सांगितले.

पुरवठादाराला नोटीस बजावणार..


मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहातील सुजाता लासुरे यांची बदली इतरत्र झाल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार औरंगाबाद येथील सहायक आयुक्त कार्यालयातील सीमा शिंदीकर यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. विद्यार्थिनींना पुरवठा करण्यात येत असलेल्या अन्नात कीटक सापडल्याच्या प्रकारावर अन्नपुरवठादार ठुबे यांना नोटीस बजावण्यात येईल, असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

साहेब, तुम्ही स्वतः पाहणी करा..


आमची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने इतके दिवस दिले तो आहार निमूटपणे पोटात ढकलला. यामुळे आम्ही आजारी पडल्यावर आमच्यावर वैद्यकीय उपचार करण्याची ऐपत घरच्यांकडे नाही. तुमच्या स्तरावरून वसतिगृहातील विद्यार्थिनींना नीटनेटका अन्नपुरवठा देण्याची मागणी या मुलींनी केली.

मुलींच्या शासकीय वसतिगृहातील किडेयुक्त वरण आणि चपाती.

बातम्या आणखी आहेत...