आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याबाहेर बदली आदेश असलेल्या निरीक्षकांना जिल्ह्यातच नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- शहर पोलिस ठाण्याची सूत्रे अखेरीस प्रभारी पदभार असलेल्या निरीक्षक अभय परमार यांच्या हाती सोपवण्यात आली आहेत. शहर पोलिस ठाण्यात नियुक्ती झालेल्या परमार यांना जिल्ह्यातच नियुक्ती मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहाला दिलेले आश्वासन खोटे ठरले. शहर पोलिस ठाण्यातील प्रभारी राजदेखील आता संपुष्टात आले आहे. 


राज्यभर गाजलेल्या आणि बहुचर्चित ठरलेल्या नगरच्या केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामुळे परमार यांना प्रशासकीय कारवाईला सामोरे जावे लागले होते. बरेच दिवस नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या परमार यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच शहर पोलिस ठाण्याचा प्रभारी पदभार पोलिस अधीक्षकांनी सोपवला होता. संगमनेरचे तत्कालीन निरीक्षक गोविंद ओमासे यांची शेवगावला बदली झाल्यापासून शहर पोलिस ठाण्याच्या कारभार प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती गेला होता. ओमासे यांची बदली करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक म्हणून गोकुळ औताडे यांच्याकडे पोलिस ठाण्याची प्रभारी सूत्रे होती. मात्र, औताडे यांना शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात फारशे यश मिळाले नाही. त्यातच घडलेल्या काही घटनांमुळे ते अडचणीत सापडल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर जावे लागले. 


तालुका पोलिस ठाण्याच्या निरीक्षकासह अन्य काही अधिकाऱ्याकडे पोलिस ठाण्याच्या कारभार सातत्याने बदलत राहिल्याने अंतर्गत कामकाज आणि गुन्ह्याच्या तपासावरही परिणाम झाला होता. शहराला शिस्त आणि गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवेल असा अधिकारी नसल्याने शहरातील गुन्हेगारी, अवैध धंदे आदी प्रकार राजरोस सुरूच राहिले. जिल्ह्यातील काही निरीक्षकासह सहायक निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या. यात संगमनेरचा प्रभारी पदभार असलेल्या निरीक्षक परमार यांचा समावेश नसल्याने त्यांना कोठे नियुक्ती मिळते. ते जिल्ह्यातच राहतात की जिल्ह्याबाहेर जातात याची उत्सुकता होती. परमार यांच्याकडे संगमनेर शहर पोलिस ठाण्याचा पदभार सोपवला गेल्याने सहा महिन्यांपासून सूरु असलेले या पोलिस ठाण्यातील प्रभारी राज संपुष्टात आले आहे. 


दरम्यान, निरीक्षक परमार यांची नगरची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने जिल्हा राज्यात चर्चेत आला. यात काही बड्या नेत्यांची नावे आरोपींमध्ये निष्पन्न झाल्याने हा विषय थेट अधिवेशनात उपस्थित झाला होता. त्यामुळे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक अक्षय शिंदे आणि निरीक्षक अभय परमार यांच्यावर कारवाईचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले होते. 


परमार यांच्यासमोर आव्हाने 
शहर पोलिस ठाणे गेल्या अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरले आहे. येथे सुरु असलेले अवैध धंदे आणि गुन्हेगारी यांचा बिमोड करण्यासोबत प्रलंबित गुन्ह्याच्या तपासाचे काम परमार यांना करावे लागणार आहे. शहरात प्रतिपोलिस ठाणे चालवणाऱ्यांचाही त्यांना बिमोड करावा लागेल. पोलिसांविषयी नागरिकात गमावत असलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी व शहरातील शांतता कायम ठेवण्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. त्यांच्याच कार्यकाळात गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एटीएम मधून लाखो रुपयांच्या चोरीचा तपास लावण्यासाठी अद्याप त्यांना काहीही धागेदोरे मिळवता आले नाहीत. 


परमार यांना पोलिस अधीक्षकांकडून दिली गेली क्लीन चिट 
केडगाव येथे ७ एप्रिलला संजय कोतकर आणि वसंत ठुबे या शिवसैनिकांची हत्या करण्यात आली. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणारे पोलिस निरीक्षक परमार यांची नगर जिल्ह्याबाहेर बदली आणि उपअधीक्षक अक्षय शिंदे यांची चौकशी कधी करणार?, आमदार संग्राम जगताप यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार का? असा प्रश्न शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी निरीक्षक परमार यांची िजल्ह्याबाहेर बदली करण्यासाठी आदेश काढून उपअधीक्षक शिंदे यांची चौकशी केली जाईल. त्यांनी या हत्याकांडाकडे दुर्लक्ष केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. शिंदे यांची बढतीवर बदली झाली, तर परमार यांना जिल्ह्यातच नेमणूक देण्यात आल्याने त्यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना क्लिनचीट दिल्याचे मानले जाते. 

बातम्या आणखी आहेत...