आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळात कमी पाण्यात घेतले कांद्याचे भरघोस उत्पादन; साडेतीन एकरात केली होती कांदा लागवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर तालुक्यातील चांबुर्डी येथील प्रगतीशील शेतकरी बबनराव दिघे यांनी कमी पाण्यात भरघोस कांदा उत्पादनाचा प्रयोग यशस्वी करून दाखवला. हवामान बदलत आहे. दुष्काळ असतानाही उपलब्ध पाण्याचा ताळेबंद करून त्यांनी साडेतीन एकरात भरघोस व दर्जेदार कांद्याचे उत्पादन काढले आहे. 

 

बबनराव दिघे यांनी पाच एकरपैकी साडेतीन एकरमध्ये कांदा लागवड केली. दुष्काळी परिस्थिती असतानाही अतिशय कमी पाण्यात पाण्याचा ताळेबंद करून कांद्याचे भरघोस उत्पादन त्यांनी घेतले. दुष्काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता दुष्काळाशी दोन हात करून शाश्वत उत्पन्न कसे घ्यावे, याचा आदर्श ठेवल. बदलत्या हवामानाचा शेतीवर मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे दुष्काळ, अतिवृष्टी,बर्फ या गोष्टी होणार आहे. या संकटावर मात करायची असेल तर शाश्वत उत्पन्न कसं घेता येईल याचा विचार करायला पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी आत्महत्या करणे हा काही पर्याय नाही, असेही बबनराव दिघे यांनी सांगितले. 

 

दिघे म्हणाले, आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्याला शाश्वत उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञान आहे. काही नावीन्यपूर्ण गोष्टी स्वीकारून त्यानुसार स्वतःच्या शेतातून सुरुवात केली पाहिजे. दुष्काळ पडणार आहे, याचा अंदाज होता. त्यानुसार पाण्याचे नियोजन करून पाण्याचा ताळेबंद केला. पाण्याचा ताण सहन करणारे कांद्याचे पीक निवडले. त्यानुसार ऑगस्ट महिन्यात कांद्याची लागवड केली. लागवडीपूर्वी हिरवळीचे खते म्हणून द्विदल धान्य, चवळी, मटकी, तूर आणि सोयाबीन, यापैकी मुगाचे पीक घेतलं. फुलोऱ्यात असताना ते रोटाव्हेटरने शेतात गाडले. त्यानंतर शेणखत, कोंबडी खत शेतामध्ये पसरवले. हिरवळीच्या खतामुळे जमिनीत असंख्य असलेले जिवाणू नत्र-स्फुरद-पालाश देतात. अन्नद्रव्य देणारे जिवाणू तयार करतात. दुय्यम अन्नद्रव्ये देण्याचे काम ते मोठ्या प्रमाणात करतात. त्यामुळे जमिनीत कर्बाचे प्रमाण वाढून जमिनीचा पोत सुधारतो. ह्युमन्स तयार होतात. जमिनीची ओलावा धारण करण्याची क्षमता वाढते. ४० ते ५० टक्के हवामानात आद्रता असते. त्यात पाण्याचे अंश असल्यामुळे पिकाला पाण्याचा ताण पडत नाही. संध्याकाळच्या वेळेस फवाराद्वारे पाण्यामध्ये सेंद्रिय खते प्रमाणानुसार स्प्रिंकलरद्वारे दिली. यामुळे पिकाची पाणी धरण्याची क्षमता वाढली. दुष्काळातही या माध्यमातून भरघोस उत्पादन मिळाले. दुष्काळावर मात करण्यासाठी अशा पद्धतीने शेतीचे योग्य नियोजन केल्यास होणाऱ्या आत्महत्या थांबतील, असा विश्वासही दिघे यांनी व्यक्त केला. चांबुर्डीचे शेतकरी बबनराव दिघे यांनी दुष्काळ परिस्थितीही पाण्याचा योग्य ताळेबंद करून कांद्याचे भरघोस उत्पादन घेतले.