Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | inspirational story In marathi

सुखी जीवनाचा मंत्र / लोभापोटी आपल्याला मिळालेली संधी गमावू नका...

रिलिजन डेस्क | Update - May 24, 2019, 12:05 AM IST

एका गरीब व्यक्तीला  सापडला चमकणारा दगड, त्याने तो दगड बांधला गाढवाच्या गळ्यात...त्यानंतर काय घडले?

 • inspirational story In marathi

  एका गावात खूप गरीब माणूस राहत होता. त्याच्याजवळ एक गाढव होते. तो दररोज आपल्या गाढवाला घेऊन कामासाठी जात असे. असेच एक दिवस तो गाढव घेऊन गावाबाहेर जात असताना, वाटेत त्याला एक चमकणारा दगड दिसला. त्याला वाटले हा तर फार वेगळा दगड आहे, आपल्या काही कामी येईल. म्हणून त्याने तो दगड गाढवाच्या गळ्यात बांधला आणि पुढे निघाला.


  वाटेत थोडे पुढे गेल्यानंतर एका शेठजीने गाढवाच्या गळ्यात तो मौल्यवान दगड पाहिला. शेठजीला लगेच समजले की, या मुर्खाला हिऱ्यांची पारख नाही. आपण याला गोड बोलून हा दगड घेऊ, असा विचार करून शेठजीने त्याला आवाज दिला. शेठ त्याला म्हणाले की, तू हा दगड मला विकत दे मी तूला चांगले पैसे देईल. त्यावर तो गरीब म्हणाला ठिक आहे, मी तुम्हाला हा दगड देतो पण याबदल्यात मला शंभर रूपये द्यावे लागतील. शेठजी म्हणाले की, हा तर फक्त दगड आहे मी तूला एवढे पैसे कसे देऊ. हा दगड मला 50 रुपयांमध्ये दे. गरीबाने दगड देण्यास नकार दिला आणि पुढे निघाला.


  शेठजीला वाटले की याला दगडाची किंमत माहित नाही, थोड्या वेळाने हा माझ्याकडेच येईल आणि 50 रूपयांत मला विकत देईल. यामुळे माझी 50 रूपयांची बचतही होईल आणि हिरासुद्धा मिळेल.


  तो गरीब माणूस थोडा पुढे गेला आणि त्याला दुसरे शेठजी भेटले. त्यांनीही दगड विकत देण्याची मागणी केली. आता गरीबाने दगडची किंमत 200 सांगितली. दुसऱ्या शेठने लगेच पैसे काढून त्याला दिले आणि हिरा घेतला.


  बराच वेळ झाला तरीही तो गरीब आला नाही म्हणून पहिले शेठजी त्याच्याकडे गेले आणि पाहतात तर काय त्याच्याकडे तो हिरा नव्हता. यावर शेठजीने गरीबाला विचारले तर त्याने सांगितले की, मी तो दगड समोरच्या एका शेठजीला 200 रूपयांना विकला. हे ऐकून शेठजीला प्रचंड राग आला, शेठजी त्याला म्हणाले, तू जगातील सर्वात मुर्ख व्यक्ती आहेस, तो मौल्यवान हिरा तू फक्त 200 रूपयांना विकलास.


  त्या गरीब माणसाला शेठजीचे हसू आले व तो म्हणाला, शेठजी मुर्ख मी नाही तर आपण आहात, मला तर हिऱ्याची पारख नव्हती, पण तूम्हाला तर माहित होते. तरीसुद्धा फक्त 50 रूपयांच्या लोभासाठी आपण संधी गमावून बसलात. त्यामुळे नुकसान माझे नाही तर आपले झाले आहे.


  कथेची शिकवण
  अनेक लोक कधी-कधी आपल्या लालचीपणामुळे चांगली संधी गमावतात. जर आपल्याला एखादी संधी मिळाली तर लगेच त्याचा फायदा घेतला पाहिजे.

Trending