आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगत्वाला धाेबीपछाड देत केला साेनेरी स्वप्नांचा पाठलाग, जिंकली १९ सुवर्णपदके

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला ताेच हेमिपरेसिस (लकवा) ने पिच्छा पकडला. माझ्या शरीराची डावी बाजू काहीच काम करीत नव्हती. मजुरी करणाऱ्या माझ्या आई-वडिलांनी क्षमतेपेक्षाही अधिक रक्कम उपचारासाठी खर्च केली. आठ वर्षांचा असनाताच वडिलांचे देहावसान झाले. एके दिवशी आईने काळजावर दगड ठेवत लहान भावाची अनाथाश्रमात रवानगी केली. काही दिवसांनी मलाही तेथे साेडले, जेणेकरून आमच्या जेवणाची भ्रांत मिटेल.  एक दिवस कळले की, दिव्यांग मुलांसाठी क्रीडा स्पर्धा घेतली जाते. परंतु त्यांच्या काेचिंगसाठी दरमहा ६ हजार रुपये फी हाेती. फी भरण्यासाठी दिल्ली परिवहन वर्कशाॅपमध्ये दरराेेज ४०-५० बस धुऊन काढत असे. यातून महिन्याकाठी ५ हजार रुपये मिळायचे. याशिवाय १००० रुपये विकलांग पेन्शन मिळत हाेती. कसेबसे ५० हजार रुपये जमा केले. नववीनंतर मी आश्रम साेडला आणि शिक्षणही थांबवले. दिव्यांग मुलांचा क्रिकेट सामना वडाेदरा येथे हाेत असल्याचे कळल्यावर मी तेथे गेलाे. माझ्यापेक्षा सुस्थितीतील मुले असल्यामुळे मला खेळण्याची संधी मिळाली नाही. दिल्लीत परत आल्यानंतर पुन्हा सराव करू लागलाे. माझा सराव पाहून प्रशिक्षक म्हणाला, तू दिव्यांगांच्या स्पर्धेत नावलाैकिक मिळवू शकशील. ही गाेष्ट माझ्या मनात घर करून बसली आणि क्रिकेट विसरून धावण्याच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित केले. २०१५ मध्ये दिव्यांगांसाठी दिल्लीत राज्यस्तरीय स्पर्धा हाेती. जीवताेड मेहनतीनंतर स्पर्धेत सहभागी झालाे आणि सुवर्णपदक मिळवले. अशा पद्धतीने मी दिल्ली राज्याकडून १०० आणि २०० मीटर धावण्याची आणि शाॅटपुट (गाेळाफेक) मध्ये तीन सुवर्णपदके मिळवली. आता माझ्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेची कवाडे खुली झाली हाेती. एक सुवर्ण मिळाल्यानंतर ६२ हजार रुपये मिळायचे, मात्र डाएट आणि अन्य बाबींसाठी यापेक्षा कितीतरी पट अधिक खर्च व्हायचा. २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले, मला विश्वास हाेता की भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हाेईन. त्यासाठी पासपाेर्टसह सर्व कागदपत्रे तयार ठेवली. २०१७ मध्ये जागतिक अजिंक्यपदाच्या सरावासाठी मला निवडले गेले. जेव्हा चीनला जायचे ठरले, त्याच्या २४ तास अगाेदर मला सांगण्यात आले की स्वखर्चाने हा दाैरा करायचा आहे. त्यासाठी १ लाख ७० हजार रुपये हवे हाेते. माझे प्रशिक्षक अमित खन्ना यांनी ३० हजार रुपये दिले, आणखी काही उसनवारी करून चीन गाठले. मेडल काही मिळाले नाही, मात्र माझे रँकिंग १५ व्या क्रमांकावरून १० व्या क्रमांकावर आले. जानेवारी २०१८ चा प्रसंग आहे. मी सराव करीत हाेताे. काही मुले माझ्याकडे पाहत हाेती. दिल्ली पॅरालिम्पिक समितीच्या एका अधिकाऱ्याने माझ्याशी खुन्नस धरली आणि त्यापाेटी मला सस्पेंड केले. बाहेरील मुलांना सराव करायला लावताे असा आराेप माझ्यावर ठेवला. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धेसाठी माझे नाव सुचवले नाही. राज्य स्पर्धेतही खेळू दिले नाही. माझ्या प्रशिक्षकाने जेव्हा वरिष्ठांकडे तक्रार केली त्या वेळी माझे नाव स्पर्धकांच्या यादीत सामील केले गेले. १००, २०० आणि ४०० मीटर स्पर्धेत राैप्यपदक पटकावले. जेव्हा मी इंडिया कॅम्पमध्ये गुजरातेत हाेताे त्या वेळी सर्दी झाली हाेती. स्पाेर्ट अथाॅरिटी आॅफ इंडियाच्या डाॅक्टरांनी आैषधे दिली, त्यानंतर सर्वांची डाेप टेस्टिंग झाली. या प्रकरणातून मी सहीसलामत निर्दाेष सुटलाे. दरम्यान, १०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. पंतप्रधान नरेंद्र माेदींनी ‘मन की बात’मध्ये माझा गाैरवपूर्ण उल्लेख केला. ज्या अधिकाऱ्याने २०१८ मध्ये मला निलंबित केले हाेते, त्यांनीच मार्च २०१९ मध्ये एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले हाेते. २६ जुलैला पाेलंडहून कांस्यपदक घेऊन परत आलाे आहे. आतापर्यंत १९ सुवर्ण, २ राैप्य आणि ३ कांस्यपदके जिंकली आहेत. आता २०२० मधील टाेकियो पॅरालिम्पिक आणि २०२२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आव्हान माझ्यासमाेर आहे. (शब्दांकन : समीर देशमुख)