बीड / स्वत:च्या वेदनेला प्रेरणा बनवत उभारले निवारा बालगृह, ६० मुलांचे जगणे सावरले

जामखेड येथील अॅड. अरुण जाधव यांच्या प्रकल्पातून निरागस जिवांना मिळतेय दिशा

विशेष प्रतिनिधी

Jul 15,2019 08:19:00 AM IST

बीड - विद्यार्थिदशेत अजाणतेपणी घडलेला अपघात. केवळ नृत्यांगनेचा व भटक्या समाजातील मुलगा असल्याने यंत्रणेकडून स्वत:सह कुटुंबाचा झालेला छळ. या घटनेनंतर मुश्किलीने जगणे सावरले, शिक्षण घेतले. मात्र, बालपणीची जखम अजूनही भळभळते. या वेदनेलाच जगण्याची प्रेरणा बनवत कोल्हाटी, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, भटक्या-विमुक्तांच्या पाल्यांसाठी मोहा (ता.जामखेड) येथे निवारा बालगृह उभारले.

आज या ठिकाणी पालकांंकडून सांभाळ होऊ शकत नसलेल्या ६० चिमुकल्यांच्या जीवनाला दिशा दिली जात आहे.
जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.अरुण जाधव यांची ही कथा. जाधव हे ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून गेली अडीच दशकं जामखेड तालुका व परिसरातील भटक्या विमुक्त समाजाच्या विविध प्रश्नांवर कार्यरत आहेत. सांस्कृतिक कला केंद्रातील नृत्यांगनेच्या पोटचा जन्म असल्याने जाधव यांचा आर्थिक व सामाजिक अडचणींचा सततचा सामना. अशा असमानतेच्या वातावरणात सकारात्मकतेला ऊर्जा बनवून जाधव यांनी उच्चशिक्षण घेतले. कोल्हाटी समाज व इतर भटक्या समाजातील बालकांच्या वाट्याला आपल्याप्रमाणे संघर्ष येऊ नये, यासाठी जाधव यांनी सन २०१४ मध्ये मोहा येथील समताभूमी परिसरात निवारा बालगृह उभारले.

सांस्कृतिक कला केंद्रातील कलावंतांच्या पाच मुलांपासून निवारा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. या ठिकाणी मुलांचे शिक्षण, भोजन, निवासाची सोय केली. प्रकल्पासाठी लोकवर्गणीची साथ घेत छोटेखानी इमारत उभारली. पाच वर्षांतच या प्रकल्पात मुलांची संख्या ६० वर पोहोचली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी, व्यवसायानिमित्त सतत भटकंतीवर असणारा समाज, सांस्कृतिक कला केंद्रातील कलावंत, तमाशा कलावंतांचे पाल्य, ज्यांचा कुठेही सांभाळ होऊ शकत नाही, अशांना अॅड.जाधव यांनी समताभूमीतील बालगृहात ‘निवारा’ दिला. आज या मुलांना अक्षर, अंकांची ओळख झाली आहे. मुले कविता म्हणतात, गीते गातात. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न फुलवतात. निवारा बालगृहामुळे आज या चिमुकल्यांच्या भरकटलेल्या जीवनाला परिवर्तनाची दिशा मिळत आहे.

दु:ख इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून केला प्रयत्न
पालकांचे छत्र नसलेल्या व भटक्या समाजातील पाल्यांच्या वाट्याला प्रचंड संघर्ष येतो. समाजाच्या प्रत्येक स्तरावर आव्हान ‘आ’ वासून असतात. अशात ही मुले भरकटून वाममार्गाला लागण्याची शक्यता असते. तो मार्ग सोडून प्रगतीच्या वाटेवर ही मुले यावीत, यासाठी निवारा प्रकल्प काम करतोय. या कामाचे समाधान वाटते.
- अॅड.अरुण जाधव, संचालक, निवारा बालगृह, जामखेड.

X
COMMENT