मुंबईत दोन वॉर / काँग्रेसकडून 'ट्रोल वॉर'ऐवजी दहा पोस्टने उत्तर, टीमकडे तगडी डेटाबँक

ऑनलाइन युद्ध टाळण्यासाठी काँग्रेसची रणनीती

वृत्तसंस्था

Oct 07,2019 07:59:00 AM IST

मुंबई : भाजपच्या जम्बो सोशल टीमचा सामना करण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. भाजपपेक्षा अगदी विरुद्ध रणनीती पक्षाने आखली आहे. एखाद्या आक्रमक-आरोप करणाऱ्या पोस्टला ट्रोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा काऊंटर करण्यासाठी काँग्रेसकडून १० माहितीपूर्ण पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यासाठी माहिती व आकडेवारी पक्षाने जमवली असून सरकारचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न आहे. मुंबईतील २ वॉर रूममध्ये ३५ कार्यकर्ते सोशल मीडिया वॉरवर नजर ठेवत ही जबाबदारी पार पाडत आहेत.


नकारात्मक बाबीपेेक्षा सकारात्मक माहिती दिली तर त्याचा मतदारांवर अधिक परिणाम पडतो, असे काँग्रेसचे मत आहे. एखाद्या ट्रोलला उत्तर देत गेलो तर विनाकारण वाद होतात. त्यातून मूळ विषय भरकटत जातो. यामुळेच ट्रोलएवजी एका पोस्टला १० पोस्टने उत्तर देण्याचा फंडा काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल संवादने स्वीकारला आहे. काँग्रेसच्या २ वॉर रूम आहेत. टिळक भवनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून प्रदेश काँग्रेसची वॉर रूम चालते. अभिजित सपकाळ व विनय खामकर त्याचे कामकाज बघतात. मुंबई काँग्रेस कार्यालयातीज वॉर रूमचे काम आशिष जोशी, रूद्रेश कौल, महेश पाटील व हिमांशू दुबे यांच्याकडे आहे.


४ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ३५ जणांची टीम कार्यरत
1. ट्विटर, व्हॉट्सअॅप फेसबुक, इन्स्टाग्रामवर काँग्रेसच्या ऑनलाइन प्रचार केला जात आहे. प्रदेश कार्यालयात ३५, तर मुंबई वॉर रूममध्ये ९ जण आहेत. मजकूर, डिझाइन, इतर पक्षांच्या पोस्टची मॉनिटरिंग व त्यांच्या पोस्टला कसे उत्तर द्यायचे यावर टीम काम करते.
2. टीमकडे राज्यातील आकडेवारी उपलब्ध आहे. ते विरोधी पक्षाने केलेल्या घोषणातील खोटारडेपणा मांडतात. ट्रोलिंग सुरू झाले की, आपल्या पोस्टची संख्या, वेग वाढवायचा असे वॉररूमचे तत्त्व आहे. त्यांचा इतर दहा सकारात्मक पोस्ट्स करण्यावर भर आहे.
3. बूथ स्तर नेत्यांनी कार्यक्षेत्रातील लोकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप्सना राज्य, जिल्ह्यांतील पोस्ट्स पाठवल्या जातात. यात दौरे, सभांच्या माहितीचा समावेश आहे. बूथ पातळीवरून आलेल्या पोस्ट महत्त्वाच्या वाटल्या तर व्हायरल केल्या जातात.


फेसबुक लाइव्हद्वारे संवाद
लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने राज्यात फेसबुक लाइव्हचा वापर केला. विधानसभेत उमेदवारांनी अर्ज भरताना काढलेल्या मिरवणुका फेसबुकवर लाइव्ह करण्यात आल्या. पुढील १०-१२ दिवसांत याचे प्रमाण वाढणार आहे.


माहितीतून पर्दाफाश करतो
काँग्रेसने वॉर रूमसाठी तरुणांना खास प्रशिक्षण दिले अाहे. भांडत बसण्यापेक्षा आम्ही खरी माहिती टाकून विरोधकांचा भांडाफोड-खोटेपणाचा पर्दाफाश करतो, असे सोशल मीडिया टीमचे समन्वयक आशिष जोशी म्हणाले.


व्हॉइस कॉलचा वापर
काँग्रेस काय करत आहे हे मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर असतो. यासाठी व्हॉइस कॉलही केले जातात. मुंबईत मराठी, गुजराती, उर्दूत संवाद साधला जातो. लोकसभेपासून ही सेवा सुरू झाली आहे. काँग्रेस अंतर्गत चर्चेसाठी टेलिग्रामचा वापर करते. त्यामुळे फाइल शेअरिंग सोपे झाले आहे.

X
COMMENT