आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरधर्मीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलीची 'जाती'च्या जाचातून आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव : आंतरधर्मीय विवाह केलेल्या दांपत्याच्या मुलीने जातीत सामावून घेऊन कुळ देण्यासाठी झालेल्या जाचाला कंटाळून गुरुवारी आत्महत्या केली. नातेवाइकांनी आत्महत्येला नैसर्गिक मृत्यूचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांना आलेल्या फाेननंतर हे जाचक वास्तव समाेर आले. जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आराेप करणारा एक अर्ज पाेलिसांना प्राप्त झाला हाेता. आजाेबांनी खाेट्या प्रतिष्ठेपायी जातीत घेण्यास नकार दिल्याने तिने आत्महत्या केल्याचा जातपंचायतीच्या सदस्यांनी आराेप केला आहे.

मानसी ऊर्फ मुस्कान आनंद बागडे (१९, रा. सिंगापूर, कंजरवाडा) असे मृत तरुणीचे नाव आहे. तिचे वडील आनंद बागडे यांनी बानाे नावाच्या महिलेशी आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेला आहे. या दाेघांना मुस्कान व काजल या दाेन मुली आहेत. आनंद बागडे यांचे वडील दिनकर बागडे हे कंजरभाट समाजाच्या जातपंचायतीचे वरिष्ठ सरपंच आहेत. मुलाने परधर्मीय महिलेशी केलेला प्रेमविवाह त्यांना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी जातीतील कविता नावाच्या महिलेशी आनंद यांचा विवाह लावून दिला. दुसरी पत्नी कविता व आनंद अमळनेर येथे राहत आहेत. मुस्कान ही उपवधू झालेली हाेती. मुस्कानचे जातीतील युवकाशी लग्न करण्यासाठी वडिलांनी तिला भाऊ विजय बागडे यांच्याकडे पाठवलेले हाेते. 'जातीतील तुम्ही म्हणाल त्या मुलाशी लग्न करायला तयार आहे. मला जातीत घेऊन जातगंगा द्या,' अशी अनेक वेळा मुस्कान हिने आजाेबा दिनकर बागडे यांच्याकडे याचना केली हाेती. मात्र, तिला व तिच्या आईला जातीत घेण्यास नकार दिला. समाजातील प्रतिष्ठेला ठेच लागेल, असे त्यांचे म्हणणे हाेते. काका विजय बागडे यांनी मुस्कानचा विवाह काेल्हापूर येथील युवकाशी निश्चित केला हाेता. रविवारी साखरपुडाही हाेणार हाेता; परंतु जातगंगाच्या माध्यमातून जातीत घेऊन कुळ देण्यास त्यांची नकारघंटा कायम राहिली. अखेर या जाचाला कंटाळून मुस्कानने गुरुवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मुस्कानच्या मृत्यूनंतरही जातपंचायतीने तिच्या वडिलांकडून समाजाच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी राेख १५ हजार रुपयांचा दंड घेऊन जातगंगा दिल्याचाही आराेप करण्यात आलेला आहे. दरम्यान, याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विराेधकांनी गैरसमज पसरवला

मुस्कानला ताप आला हाेता. ताे मेंदूत गेल्याने तिचा दाेन तासांतच मृत्यू झाला. नातेवाईक दूरवरून येणार असल्याने अंत्यसंस्काराला उशीर लागला. माझ्या विराेधकांनी हा गैरसमज पसरवल्याचे मुस्कानचे वडील आनंद बागडे म्हणाले.

पंचायतीमुळे आत्महत्या नाही

जातपंचायतीने तिला जातीत घेण्यास नकार दिल्याने आत्महत्या करावी लागल्याचा विषय चुकीचा असल्याचे कंजरभाट समाजाचे सेवानिवृत्त सदस्य सावन गागडे म्हणाले.

अंत्यसंस्कारावेळी मृतदेह शवविच्छेदनासाठी आणला

नातेवाइकांनी मुस्कानच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली हाेती. मात्र, एमआयडीसी पाेलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत असल्याचे सांगितले. या वेळी तिच्या आईने आक्राेश केला. मृतदेह नेण्यास नातेवाइकांनी विराेध केला. पाेलिसांनी मृतदेह शासकीय रुग्णवाहिकेत आणला. तिचा गळफास लावल्याने मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्प‌ष्ट झाले आहे.