आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रावर ऊर्जानिर्मितीसाठी प्रयत्न, एक रुपया युनिटपेक्षाही कमी दरात मिळू शकेल वीज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बाहेरच्या देशांपेक्षा तुलनेने भारतामध्ये निर्मिती आणि संशोधन क्षमता प्रचंड प्रमाणात आहे. या क्षमता वापरून येत्या काही वर्षांमध्ये चंद्रावरील रगॉलिथ या द्रव्यावर प्रक्रिया करून ऊर्जानिर्मिती प्रकल्प स्थापण्याच्या हालचाली सुरू आहेत. आता साधारण चार रुपये प्रति युनिट मिळणारी वीज या प्रकल्पामुळे एक रुपया प्रति युनिटपेक्षा कमी दराने उपलब्ध होईल, असे 'व्हिजन' ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. सिवथानू पिल्लई यांनी मांडले. 

 

संदीप फाउंडेशन येथे आयोजित 'आईस मेल्ट्स २०१८' या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. चंद्रावरील रगॉलिथ या द्रव्यावर प्रक्रिया करून त्याच्यापासून हेलियम ३ तयार केले जाणार आहे. त्यासाठी चीन आणि अमेरिकेसह भारत चंद्रावर ऊर्जानिर्मिती प्रकल्प स्थापणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताची मोठी क्षमता कारणी लागणार आहे. या प्रकल्पासाठी फ्यूजन टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. परंतु, सध्या भारताला चंद्रावर जाण्यासाठी आपला वेग वाढवण्याची गरज आहे. सध्या चंद्रावर जायला लागणाऱ्या चार दिवसांऐवजी तीन दिवसांत हा प्रवास पूर्ण होणे यासाठी गरजेचे आहे. सुरुवातीला या गोष्टीवर काम करून मग पुढे चंद्रावर प्रकल्प उभारला जाणार आहे. येत्या ५० वर्षांतील देशाच्या व्हिजनबाबत ते म्हणाले, सोलर सेल स्वत: देशात तयार करून त्यामध्ये नॅनो टेक्नॉलॉजी वापरण्याचे आव्हान आपल्याला येत्या काळात स्वीकारायचे आहे. भारतीय शास्त्रज्ञ एखादी गोष्ट आव्हान म्हणून पटकन स्वीकारतात. त्यामुळे भारत लवकरच जगातील सर्वोत्तम देश बनू शकेल. 

 

आयात बंद करून देशात आज भारतामध्ये ६०० मिलियन तरुण असल्याने देशाकडे प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता वापरून भारताने बाहेरील देशांतील आयात बंद करून भारतात वस्तू बनविण्यास सुरुवात करायला हवी, असे मत डॉ. पिल्लई यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले. 

 

शहरे पाण्याखाली जाण्याची भीती, फ्लोटिंग सिटी पर्याय 
भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी येत्या ५० वर्षांत वाढून शहरे पाण्याखाली जाण्याची भीती आहे. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत तरंगत्या शहराचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. आज प्रत्यक्षात दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी एकेकाळी स्वप्न वाटत होत्या. विमानसुद्धा एकेकाळी स्वप्न होते. त्यामुळे चीनच्या बरोबरीने भारताचेदेखील तरंगत्या शहरांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...