आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांच्या स्वावलंबनाचा अनोखा कित्ता, नाशिक शहरात शंभरहून अधिक लेडी बाउन्सर्स कार्यान्वित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : विवेक बोकील, नाशिक - Divya Marathi
छाया : विवेक बोकील, नाशिक

खाली मान आणि लवलेली नजर... बाईपणाच्या या चाकोरीबद्ध प्रतिमेवर घाव घालणाऱ्या या साऱ्याजणी आहेत लेडी बाउन्सर्स ! बाईनं नाजूक असावं ही ठोकळेबाज अपेक्षा करणारा समाज बाईच्या याच “नाजूक'पणाचा गैरफायदा घेतो. तिच्या सुरक्षेचा मक्ता घेत, तिच्यावरील अन्याय-अत्याचारांच्या कथा चघळत राहतो. या अन्यायी व्यवस्थेवर खरे घाव घालताहेत त्या चाकोरीबाहेरची कामाची वाट निवडणाऱ्या या लेडी बाउन्सर्स. विशेष म्हणजे फिजिकल फिटनेसची क्रेझ वगैरे असलेल्या या महानगरी तरुणी नाहीत, तर एक-दोन लेकरांच्या माता असलेल्या नाशिक, जळगाव, चाळीसगाव या शहरातील रहिवासी आहेत. यात सुप्रिया भालेराव आहे, शारदा दिघोळे आहे, नुसरत सय्यद आहे, मारिया निकम आहे. लेडी बाउन्सर म्हणून महिलांसाठी खुल्या झालेल्या या नव्या क्षेत्रात काम करू लागल्यावर या साऱ्याजणींना जाणवतोय तो त्यांच्याकडे बघणाऱ्या “नजरां'मध्ये झालेला बदल आणि त्यांचा स्वत:कडे बघण्याच्या दृष्टिकोनात पडलेला फरक. स्वत:सोबत इतरांच्याही सुरक्षेसाठी झटणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि भावनिक सक्षमतेच्या कसोट्या दररोज पार पाडणाऱ्या या साऱ्याजणींना आजच्या जागतिक महिला दिनी “दिव्य मराठी'तर्फे मानाचा मुजरा !
 

नाशिक - एखाद्या इव्हेंटमध्ये सेलिब्रिटीभोवतीची गर्दी हटवण्याचे काम असो वा एखाद्या उपक्रमातील झुंबड रोखण्याचे काम असो. काळ्या वेषातील मजबूत हात आणि भेदक डोळे सुरक्षेची जबाबदारी निभावत असतात. मजबूत बांधा, काटक शरीर आणि गर्दी रोखण्याचं कमवलेलं कसब या कौशल्यावर आधारलेल्या बाउन्सर्सच्या ‘पुरुषप्रधान’ व्यवसायात सध्या महिलांनी मुसंडी मारली आहे. नाशिक शहरात शंभरहून अधिकजणी ‘लेडी बाउन्सर्स’ म्हणून पाय रोवू पहात आहेत. विशेष म्हणजे, यात सर्व जाती वर्गातील महिलांची आघाडी आहे.कुणी होमगार्डमध्ये काम करीत होतं. कुणी सुरक्षारक्षक. कुणाच्या घरची परिस्थिती बेताची म्हणून तर कुणाच्या हातात काम नव्हते पण मनगटात धमक होती. अशा साऱ्याजणींना एका व्यक्तीनं एकत्र आणलं. लेडी बाउन्सर म्हणून आपण काम करू शकतो हा विश्वास दिला, ते नाव म्हणजे दीपाली वाणी. स्वामी समर्थ इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून काम करताना त्यांनी नाशिक, जळगाव, चाळीसगाव परिसरातील शंभरहून अधिक महिलांना प्रशिक्षण देत रोजगार दिला आहे.लेडी बाउन्सरचे काम करणाऱ्या या साऱ्याजणी कोणत्याही क्रेझमुळे या व्यवसायात आलेल्या नाहीत तर कामाची गरज आणि निर्भिड वृत्तीमुळेच आल्या आहेत. यातील बहुतांश विवाहित असून लेकरांचे संगोपन, कुटुंबाची जबाबदारी सांभाळत मॉल, शाळांमध्ये सुरक्षारक्षक अशी पूर्णवेळ नोकरी अशा तिहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या आहेत. फिजिकल फिटनेस तयार झाल्यावर ड्रेसअप, गेटअप आणि बाउन्सिंगचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले.

मोबदल्यातील आर्थिक तफावत दूर व्हावी

ऑफिसमध्ये काम करताना पुरुष बॉसेस तर घरात नवरे महिलांची उपेक्षा करीत असल्याचे मी बघत होते. तुला काही जमत नाही. तुला काही जमणार नाही याचा पाढा एेकून महिलांचाही आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला होता. सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या महिला बारा तास काम करत, पण पुरुषांच्या तुलनेत कमी मोबदला पण जास्त शिव्या खात होत्या. त्याचवेळी मी लेडी बाउन्सर्स तयार करण्याचे ठरवले. नाशिकसह जळगाव, चाळीसगाव येथून मोठ्या संख्येने महिला जोडल्या जात आहेत. लेडी बाउन्सर्ससाठी मागणीही वाढत आहे. प्रश्न आहे तो पुरुष बाउन्सर्सना जास्त रोज आणि महिलांना कमी या विषम वागणुकीचा. - दीपाली वाणी, संस्थापक, स्वामी समर्थ लेडी बाउन्सर्स ग्रुपबातम्या आणखी आहेत...