आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलने काढली ब्ल्यू कॉर्नर नोटीस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद : स्वयंघोषित बाबा नित्यानंदविरोधात इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढल्याची माहिती गुजरात पोलिसांनी बुधवारी दिली. कर्नाटकात नित्यानंदविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो गेल्या वर्षी भारताबाहेर पळून गेला आहे. गुजरात पोलिसांनी नित्यानंदच्या आश्रमातून दोन मुली बेपत्ता झाल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्याविरोधात दाखल गुन्ह्याच्या आरोपपत्रात याबाबत माहिती दिली आहे.

पोलिस अधीक्षक के. टी. कामरिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, इंटरपोलने याच महिन्यात वादग्रस्त नित्यानंदविरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढली आहे. पोलिसांनी नित्यानंदविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नित्यानंदचा तपास लागू शकलेला नाही. महिला शिष्यांवर बलात्काराचा आरोप असलेला नित्यानंद पोलिस आणि तपास यंत्रणांना कोणताही सुगावा लागू न देता देश सोडून पळून गेला आहे. एवढेच नव्हे तर त्याने एक व्हिडिओ प्रकाशित करत तपास संस्थांना जणू एक प्रकारे आव्हानच दिले होते. या व्हिडिओ संदेशात नित्यानंदने म्हटले होते की, कोणतेही न्यायालय त्याला शिक्षा देऊन खरे बोलण्यापासून रोखू शकत नाही. तो भगवान शंकराचा अवतार असून हे सत्य तो जगाला सांगू इच्छितो, असा त्याने दावा केला होता. नित्यानंदवर कर्नाटकातही शिष्यांवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा पासपोर्ट २०१८ मध्येच रद्द करण्यात अाला आहे. तो नेपाळमार्गे विना पासपोर्ट पळून गेल्याचा तपास यंत्रणा संशय आहे. नित्यानंद पळून गेल्याचे समजल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने सर्व देशांमधील भारतीय वकिलातींना सतर्क केले आहे. एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी एखाद्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी किंवा त्याची माहिती मिळवण्यासाठी ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढली जाते, तर एखादा हवा असलेल्या आरोपीस अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस काढली जाते.

इक्वेडोरमध्ये जमीन खरेदीचा केला होता दावा

इक्वेडोरमध्ये हजारो एकर जमीन खरेदी करून तेथे कैलास नावाचा हिंदू देश बनवण्याचा दावा एका वेबसाइटवर नित्यानंदने केल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला होता. याची दखल घेत परराष्ट्र मंत्रालयाने खुलासा केला होता की, इक्वेडोर सरकारने नित्यानंद तेथे असल्याचा दावा फेटाळला होता. नित्यानंद कोणत्या देशात आहे याबाबत माहिती नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. नित्यानंदने जमीन विकत घेऊन नवा देश स्थापन केल्याचा दावाही इक्वेडोर सरकारने फेटाळून लावला होता.
 

बातम्या आणखी आहेत...