आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाला नवा पंतप्रधान हवा, मोदींविरुद्ध आमच्याकडे कोण असेल याबद्दल निवडणुकीनंतरच सांगणार : अखिलेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपला २०१९ मध्ये सत्तेबाहेर करण्यासाठी समाजवादी पार्टी महायुतीत सहभागी होईल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध कोण हे निवडणुकीनंतर कळेल, असे सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले. महायुतीसह इतर मुद्द्यांवर त्यांनी 'भास्कर'च्या विजय मनोहर तिवारी यांच्याशी बातचीत केली. 


प्रश्न- महायुतीचा चेहरा कोण असेल- राहुल, मायावती, ममता की तुम्ही? 
उत्तर -
आमचा सामना भाजपशी आहे. जीएसटी व नोटबंदीनंतर जनता आणि अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. लोक भाजपच्या धोरणांमुळे नाराज आहेत. देशाला नवा पंतप्रधान हवा आहे. तो कोण असेल हे निवडणुकीनंतर ठरणार आहे. 


प्रश्न - नवा पंतप्रधान का हवाय? तो कोण असेल ? 
उत्तर -
आमचे पंतप्रधान धोरण न आखता परदेश दौरा करतात. देशाला काही फायदा झाला का? पंतप्रधान जेथे जेथे गेले तेथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, बेरोजगारी वाढली, देशाला काही फायदा झाला का? याबद्दल भाजपने सांगावे. 


प्रश्न - राहुल मोदींना चांगला पर्याय आहेत का? तुमच्याकडे कोण असेल खरा प्रतिस्पर्धी? 
उत्तर -
या वेळी गरीब शेतकरी नाराज आहेत. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहेत. प्रश्न व्यक्तीचा नाही. तरुण, शेतकरी, व्यापारी सर्व जण नाराज आहेत. 


प्रश्न- लढण्यासाठी एक चांगला चेहरा पण हवा? 
उत्तर -
आमचा मुद्दा बेरोजगारी हा आहे. जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधा देशातही हव्यात. महागाई आणि चुकीच्या पद्धतीने जीएसटीच्या अंमलबजावणीचा मुद्दाही आहेच. 


प्रश्न - मायावती गेम चेंजर ठरतील का? 
उत्तर -
तुम्हालाही माहिती आहे कोण गेम चेंजर असेल. जर मायावतीजी असतील तर तुम्ही खूप मोठी गोष्ट बोलत आहात. याचाच अर्थ तुमच्या लक्षात सर्वकाही आले आहे. 


प्रश्न - अखिलेश यादव -राहुल गांधी यांची मैत्री उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थानात का नाही? 
उत्तर -
आमची संघटना काँग्रेस आणि बसपसोबत युती करण्यासाठी तयार आहे. आमचे सायकलवर प्रेमही आहे. संघटना वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मध्य प्रदेशही आमचे लक्ष्य आहे. तेथे आम्ही ताकद वाढवू शकतो. 


प्रश्न - नोटबंदी, जीएसटीनंतरही यूपी, गुजरातमध्ये भाजप जिंकला? 
उत्तर -
आम्ही समजावून थकलो, पण थापा मारून ते पुढे गेले. पंतप्रधानांनी पहिल्या भाषणात काळा पैसा परत आणू, भ्रष्टाचार संपेल, दहशतवादाला आळा घालू, असे म्हटले. पण सत्य काय आहे हे जाणून घेण्याची माझीही इच्छा आहे. 


प्रश्न : मोदी यशस्वी आहेत, पण विरोधक कमकुवत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी यशस्वी होईल का? 
उत्तर :
खोटे बोलणे, मुद्द्यांपासून लक्ष विचलित करणे यामुळे भाजप यशस्वी आहे. ही ताकद विरोधकांकडे नाही. 


प्रश्न : विरोधक कमकुवत आहे असे वाटत नाही? 
उत्तर :
मुद्द्यांपासून लक्ष विचलित करण्याची कुवत विरोधकांकडे नाही. भाजपला यश मिळत नाही हे विरोधकांनी दाखवून दिले आहे. उत्तर प्रदेश हे त्याचे मोठे उदाहरण आहे. तेथे मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी प्रचार केला, पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षच आपल्या जागांवर हरले. जनता आता त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. 
 

प्रश्न : महाआघाडी यशस्वी झाली तर तुमची भूमिका काय असेल? 
उत्तर :
सायकल आमची व्हावी एवढेच आमचे स्वप्न आहे. मध्य प्रदेशातही आमची सायकल असावी, असे आम्हाला वाटते. आसपास जेथे आमची ताकद आहे तेथे सायकल समाजवाद्यांचीच असावी. 
 

प्रश्न : मोदींच्या कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही प्रभावित आहात, कोणत्या गोष्टीमुळे ते लोकप्रिय झाले? 
उत्तर :
एवढ्या आत्मविश्वासाने खोटे बोलणे आम्हाला त्यांच्याकडून शिकायचे आहे. त्यांच्याप्रमाणेच टेलीप्रिंटरद्वारे कबीरदासजींचे दोहे वाचण्याची आमची इच्छा आहे. त्यांच्या या गोष्टी मला खूप आवडतात. 
 

प्रश्न : मोदी सरकारला दहापैकी किती गुण द्याल? 
उत्तर :
पंतप्रधान आमच्याच कामांचे उद््घाटन आणि शिलान्यास करत असतील तर आम्ही गुण देणार नाही. जनताच गुण देईल. 
 

प्रश्न : आजही निवडणूक जात, धर्म आणि विभागाच्या मुद्द्यांवरच होते. विकास आणि आर्थिक मुद्द्यांवर नाही. त्याचे कारण? 
उत्तर :
हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे. माझ्या दृष्टीने सर्वात जातीयवादी पक्ष कोणी असेल तर तो भाजपच. काम बोलते, असा नारा मी उत्तर प्रदेशमध्ये दिला होता. लढाऊ विमान उतरवता येऊ शकेल असा आग्रा-लखनऊ महामार्गासारखा देशातील दुसरा रस्ता दाखवा. पंतप्रधान कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत ज्या विमानात बसले होते तेही समाजवादी सरकारचीच देणगी होते. ज्या प्रकल्पाचे उद््घाटन त्यांनी केले त्याची गुंतवणूक आमच्याच काळातील होती. एक्स्प्रेस-वेचा शिलान्यास केला. आम्ही कामावर मते मागत होतो. 
 

प्रश्न : मग जनतेने तुम्हाला पुन्हा का निवडून दिले नाही? 
उत्तर :
सर्वात मोठा जातीयवादी पक्ष भाजपच आहे. उत्तर प्रदेशच्या निकालांवरूनच भाजपने सोशल इंजिनिअरिंगचा मुद्दा मांडला. हे सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय हे मलाही समजत नाही. भाजप धर्माच्या मुद्द्यावर लोकांना भावनात्मक बनवतो. 
 

प्रश्न : आघाडीमुळे अस्थिर सरकारची शक्यता ? 
उत्तर :
ही तर खूप चांगली गोष्ट आहे. भाजप ४७ पक्षांसोबत सरकार चालवत आहे. आम्हीही मैदानात आहोत. सध्या ५-६ पक्ष आहेत. आणखी ४० पक्ष येऊ शकतात. आम्हीही भाजपकडून काही शिकू. ४५ पक्षांसोबत सरकार चालवू. 
 

प्रश्न : आघाडीतील पक्ष मुकाबला करू शकतील? 
उत्तर :
ही निवडणूक गरीब, शेतकरी आणि त्रस्त नागरिक लढतील. त्यांना जन-धन खात्यात १५ लाख रुपयांची प्रतीक्षा आहे. बँका त्यांची खाती बंद करत आहेत. कर्जमाफीचा उल्लेख केला. यूपीत २० पैशांचे कर्ज माफ झाले आहे. ही काय कर्जमाफी आहे? यूपीत पाच कोटी खात्यांना केंद्र सरकारच्या योजनांच्या फायद्याची प्रतीक्षा आहे. मध्य प्रदेशमध्ये शेतकरी गोळीबारात ठार झाले. हीच जनता मुकाबला करेल. 
 

प्रश्न : पासवान आणि आठवले गरीब सवर्णांना आरक्षण देण्याचे समर्थक आहेत. आर्थिक आधारावर आरक्षणाबाबत तुमचे मत काय? 
उत्तर :
भाजपनेही सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दिले आहे. तुम्ही जनतेला नाराज करू नका, असे मला भाजपला सांगायचे आहे. आधारावर किती खर्च केला आहे? काँग्रेसने सुरू केला, भाजपने तेच पुढे सुरू ठेवले. एकदा सर्वांची गणती करा. सर्वांना हक्क आणि सन्मान मिळायला हवा. आपली राज्यघटना हेच म्हणते. आम्हाला राज्यघटनेच्या बाहेर जायचे नाही. 
 

प्रश्न : तुम्ही मुख्यमंत्री असताना नोएडाला कधी गेले नाही. तुम्हीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवता का? 
उत्तर :
मांजर आडवी आल्यास भाजपवाले कदाचित रस्ता ओलांडत नसतील. मांजर आडवी आली तर आम्ही वाहन थांबवतो. आम्ही असे आहोत. पुढील वेळा सरकार आले तर नोएडाला जरूर जाईन, असे मी म्हटले होते. पुढील वेळा आले तर नोएडाला जाईन. 
 

प्रश्न : उत्तर प्रदेशात तुमच्या कार्यकाळातही भरतीवरून वाद झाला होता. का? 
उत्तर :
त्यावर संशोधन व्हावे. प्रकरणाचा सीबीआय तपास सुरू आहे. पोलिस भरतीसह इतर भरती प्रक्रियांकडे कोणी बोट दाखवू शकत नाही. यूपीत प्रथमच सोपी भरती प्रक्रिया करून दाखवली. मध्य प्रदेशमध्ये १२ वर्षांत किती भरती झाली हे मला माहीत नाही. माझ्या वेळी ७० हजारपेक्षा जास्त पोलिसांची भरती झाली. सोपी भरती प्रक्रिया. पण आमच्याविरोधात खोटा प्रचार झाला. 
 

प्रश्न : समाजवादी पक्ष बसपच्या दबावाखाली आहे. त्यामुळे बसपला जास्त जागा देण्याची तयारी आहे का? 
उत्तर :
सप-बसप यांची आघाडी यापूर्वीही झाली आहे. निकालही सर्वांना माहीत आहे. 
 

प्रश्न : सप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले काही खासदार पुन्हा परतण्यास तयार आहेत ? त्यांचे स्वागत कराल ? 
उत्तर :
आमची दारे सर्वांसाठी खुली आहेत. वयाची पंचाहत्तरी पार केलेल्यांना भाजप तिकीट देणार नाही, असे मी ऐकले आहे. तिकीट मिळणार नाही त्यांनी आमच्याकडे यावे. आम्ही कमी वयाच्या लोकांनाही जास्त तिकिटे देतो. वृद्धांनाही तिकिटे देतो. 
 

प्रश्न : गुंडांचा पक्ष अशी सपाची प्रतिमा अजूनही आहे का? 
उत्तर :
आज सपाच सर्वात प्रगतिशील आणि धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. विकासाची गोष्ट करणाऱ्या तरुणांचा पक्ष आहे. जगात समाजवाद पुन्हा परतत आहे. सपाची नवी पद्धत वेगळी आहे. आम्ही शहरात मेट्रो आणली, एक्स्प्रेस-वे आणला. काँग्रेस किंवा इतरांच्या काळात असा मार्ग झाला असेल तर सांगा. आम्ही १८ लाख लॅपटॉप दिले.. एमबीबीएसच्या जागा वाढवल्या. एका दिवसात पाच कोटी रोपे लावली. ती शंभर टक्के जगली. हरित पट्टे बनवले. सपाकडे या नजरेने पाहा. 

बातम्या आणखी आहेत...