आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Interview Of Governor Malik 3 Days After Cancellation Of Article 4 ... Learn What He Said About The Change In Kashmir Now

कलम ३७० रद्द झाल्यानंतर ५० दिवसांनी राज्यपाल मलिक यांची मुलाखत... काश्मीरमध्ये आता काय बदल झाला याबाबत ते काय म्हणाले जाणून घ्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० मधील बदल आणि कलम ३५ अ रद्द होऊन गेल्या मंगळवारी ५० दिवस पूर्ण झाले. तेथे आता स्थिती काय आहे आणि भविष्यात काय होईल हे जाणून घेण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी चर्चा केली. पवन जोशी यांच्याशी झालेल्या या चर्चेचा हा सारांश-
 

> प्रश्न: जम्मू-काश्मीरमध्ये आता काय बदल झाला आहे? 
मलिक: गेल्या ५० दिवसांचे रेकॉर्ड असे आहे की येथे एकही गोळी चालली नाही, कोणाचाही मृत्यू झाला नाही. हे ७० वर्षांत प्रथमच झाले आहे. बुरहान वानीच्या मृत्यूच्या वेळी येथे ११० जण ठार झाले होते. चार महिने सर्व काही बंद होते. आता सफरचंदाचे ११०० ट्रक रोज विक्रीसाठी जात आहेत. प्रथमच नाफेडने आतापर्यंत ८८०० कोटी रुपयांची सफरचंद खरेदी केली आहे. सर्व सरकारी रुग्णालयांत औषधी उपलब्ध आहेत. रुग्णालयांत ७० हजार शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शाळांत सुरक्षेमुळे मुले येत नाहीत. पेनड्राइव्हद्वारे मुलांना अभ्यासक्रम त्यांच्या घरपोच देत आहोत. शाळांत परीक्षा वेळेवर होतील.
 

> प्रश्न: येथे मुले तणावात जगत आहेत, असे तुम्ही म्हटले होते. कलम ३७० हटवल्यानंतर काय फरक जाणवतो? 
मलिक: येथील मुलांमध्ये खेळाची खूप आवड आहे. आम्ही तणाव कमी करण्यासाठी खेळांना प्रोत्साहन देत आहोत. रायझिंग काश्मीर नावाच्या संस्थेला आम्ही चार कोटी रुपयांची मदत केली आहे. मी दोन घटना सांगतो. पहिली म्हणजे येथील युवकांत फुटबॉलची खूप क्रेझ आहे. येथे एक सामना झाला होता. तो पाहण्यास २५ हजार मुले आली होती. दुसरी म्हणजे येथील एका तरुणाची निवड आयपीएलसाठी झाली होती, त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घरी १५ हजार लोक गेले होते. आम्ही  खेळाचे बजेट वाढवण्यास सांगितले आहे. सहा स्टेडियम आणि दोन आंतरराष्ट्रीय स्टेडियम तयार झाले आहेत.  
 

> प्रश्न: ५० हजार युवकांना नोकरी देण्याची चर्चा झाली होती? 
मलिक: आम्ही ५० हजार नव्हे तर ६९००० लोकांना सरकारी नोकऱ्या पुढील तीन महिन्यांत देऊ. प्रत्येक गावातील पाच युवकांना सरकारी नोकरीसाठी निवडण्याची योजना आहे. सर्व ६९००० पदांवर स्थानिक युवकांचीच भरती होईल.

> प्रश्न: पंतप्रधानांनी देशातील मोठ्या गुंतवणूकदारांना जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीचे आवाहन केले होते. त्याचा काही परिणाम झाला का?
मलिक:  येथे गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी आहेत. येथे बीपीओ उघडू शकतात. सफरचंदांवर आधारित उत्पादने तयार होऊ शकतात. कोल्ड स्टोअरेज उघडू शकते. लेह-लडाखमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उघडू शकतात. येथे गुंतवणूकदारांची परिषद होणार असून गृहमंत्री अमित शहांसह अनेक मान्यवर तिला संबोधित करतील. रिलायन्स आणि टाटा कंपनीने व्हिजिट केली आहे. आतापर्यंत ७० ते ८० कंपन्यांनी आमच्याकडे गुंतवणुकीसाठी विचारणा केली आहे. आम्ही त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करत आहोत. कंपन्यांना कोणते उद्योग सुरू करण्याची इच्छा आहे आणि त्यात स्थानिक लोकांना किती रोजगार मिळेल हे आम्ही पाहत आहोत.

प्रश्न: जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक केव्हा होईल? आयोगासोबत कोणती योजना केली का? 
मलिक: निवडणूक घेण्याचे काम आयोगाचे आहे. अद्याप बरेच काम बाकी आहे. परिसीमन आणि पुनर्गठन यामुळे माझ्या मते एक वर्ष लागू शकते.

प्रश्न: कलम ३७० रद्द झाल्यानंतर लोकांच्या जीवनात काय बदल झाला आहे? 
मलिक: लोकांनाही प्रशासनात सहभाग हवा आहे. सफरचंद खरेदी होऊ नये असा प्रयत्न नेत्यांनी केला. पण केंद्र सरकारने खरेदी केली. येथील नेत्यांनी एवढा भ्रष्टाचार केला आहे की, लोक त्यामुळे खूप त्रस्त आहेत. मी एक उदाहरण देतो. जम्मू-काश्मीर बँकेत भरती झाली. नेत्यांनी आपल्या पसंतीच्या ५८२ लोकांना नोकरी दिली. मी येथे येण्याआधी काही युवक त्याविरोधात निदर्शने करत होते. जेव्हा मी त्या युवकांशी चर्चा केली आणि घटनेची चौकशी केली त्यातील निष्कर्ष ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आपल्या पसंतीच्या आमदारामार्फत अपात्र लोकांना नोकरी दिली होती. मी पूर्ण भरतीच रद्द केली. त्यानंतर एक युवती मला भेटण्यास आली. असे प्रथमच घडल्याचे तिने सांगितले. या भरती घोटाळ्यात अनेक मोठे नेते अडकल्याचे दिसेल असा माझा दावा आहे.

> प्रश्न: आतापर्यंत किती नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे? किती दिवस ते नजरकैदेत राहतील?
मलिक: बुरहान वानीच्या मृत्यूनंतर जेवढ्या लोकांना अटक झाली होती त्याच्या एकचतुर्थांशच लोकांना अटक झाली आहे. आतापर्यंत दोन हजार लोक अटकेत आहेत. उपद्रव घडवू शकतात किंवा घडवून आणू शकतात अशांनाच नजरकैद केले आहे. बुरहान वानीच्या वेळी आठ हजार नेत्यांना नजरकैद केले होते. 

> प्रश्न: जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांना येण्याची इच्छा आहे. पण सध्या कोणी दिसत नाही. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी काय प्रयत्न कराल?
मलिक: सध्या माझ्याकडे अनेक हॉटेल मालक आले आणि हॉटेल बंद असल्याचे त्यांनी सांगितले. बँकांकडून कर्ज घेऊन हॉटेल बनवले होते. आम्ही बँकांशी चर्चा करू व्याजावर सूट देण्याचे प्रयत्न केले आहेत. आम्ही अधिकाऱ्यांना बाहेरच्या राज्यात पाठवून लोकांना आमंत्रित करू. जम्मूत सर्वाधिक संधी आहेत. तेथे हॉटेल आणि रिसॉर्ट उघडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आम्ही पर्यटकांसाठी महाराजा की मंडी या पर्यटनस्थळावर साठ कोटी रुपये खर्च करणार आहोत.