आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सरकारबद्दल प्रचंड राेष; तरीही सरकार निवडून आले तर ईव्हीएमचा घाेळ : खासदार डॉ. अमोल कोल्हे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सचिन कापसे, मंगेश फल्ले 

मुंबई - ‘पाच वर्षांत राज्य सरकार केवळ आलेला दिवस पुढे ढकलण्याचेच काम करत आहे. पाच वर्षांत सर्वसामान्यांचे प्रश्न सरकारने मार्गी लावलेच नाहीत. केवळ ‘वंदे मातरम’ आणि ‘भारतमाता की जय’ अशा घाेषणा देऊन मूळ प्रश्नांना बगल देण्याचे काम केले. जनतेच्या मनात सरकारबद्दलचा प्रचंड राेष असल्याचे यात्रेदरम्यान आम्हाला जाणवले. इतका राेष असतानाही जर हे सरकार निवडून आले तर ताे ईव्हीएमचाच घाेळ असेल,’ असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व अभिनेते डाॅ. अमाेल काेल्हे यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केला.
 

> प्रश्न : शिवसेना साेडण्याचे खरे कारण काय ?
डाॅ. काेल्हे : शिरूरमधील काही महत्त्वाचे मुद्दे हाेते. शिवसेनेच्या तत्कालीन खासदारांनी घेतलेले काही निर्णय विचित्र वाटले. चाकण विमानतळ स्थलांतराचा निर्णय चुकीचा हाेता. पुणे-नाशिक ‘हायवे’चे प्रश्नही मार्गी लावले नव्हते. राष्ट्रवादीशी माझे नाते आधीपासूनच हाेते. पूर्वी मी शिवसेनेत जरी असलाेे तरी संघटनात्मक पदावरच काम करत हाेताे. लाभाचं पद माझ्याकडे नव्हतं. शरद पवारांनी मला राष्ट्रवादीत येण्याचा प्रस्ताव दिला, त्याला मी प्रतिसाद दिला. राजकारणाचा एकूण पाेत बदलत असताना राष्ट्रवादीच्या विचारासाेबत आपण जावं, असं मला वाटलं. 

> प्रश्न : शेतकरी, मंदी, बेराेजगारीकडे दुर्लक्ष करून भावनात्मक मुद्द्यांना हात घातला जाताेय ?
डाॅ. काेल्हे : नक्कीच. महाजनादेश यात्रेत एका शेतकऱ्याने प्रश्न केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले. फक्त ‘भारतमाता की जय’ची घाेषणा दिली. हा जबाबदारी नाकारण्याचा प्रकार आहे. गेल्या पाच वर्षांत १६ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मुख्यमंत्र्यांचं शहर क्राइम कॅपिटल झालंय. कर्जमाफी कुणाची झाली? शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. पाकिस्तानातून कांदा आयात केला जाताे, अन् इकडे भाव नाही म्हणून कांद्याच्या ढिगाऱ्यावर शेतकरी आत्महत्या करत आहे. विमा कंपन्यांना १६ हजार काेटींचा नफा कसा हाेताे? पवार साहेब कृषिमंत्री असताना त्यांनीही आयात केली हाेती, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी हाेती. तेव्हा अन्नसुरक्षेचा निर्णय महत्त्वाचा हाेता. 

> प्रश्न: शरद पवार यांच्या पाकिस्तानबद्दलच्या विधानाबद्दल आपल्याला काय वाटते?
डाॅ. काेल्हे : हे दुर्दैवी आहे. पवार साहेबांचे विधान हे क्रिकेट टीमच्या संदर्भात हाेते. ताेडून-माेडून या विधानाचा वेगळा अर्थ लावून कुठेतरी भावनिक मुद्द्यांवर जाण्याचा हा प्रयत्न हाेता.  

> प्रश्न : बेराेजगारी, विकासाबाबत काय वाटते ? 
डाॅ. काेल्हे : ४५ वर्षांतली सर्वात माेठी बेराेजगारी आता आहे. जीडीपी ५ टक्क्यांवर आलाय. मुख्यमंत्री सांगतात ‘महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खूप चांगली आहे.’ आॅटाेबाेमाइल इंडस्ट्रीलाही फटका बसला आहे. ३ शिफ्टमध्ये चालणाऱ्या अनेक कंपन्या सिंगल शिफ्टवर आल्यात. राज्यात ७२ हजार लाेकांना नाेकऱ्या देणार हाेते, त्याचे काय झाले? मध्य प्रदेशातल्या व्यापमं घाेटाळ्यातील ब्लॅकलिस्ट कंपनीलाच महापाेर्टलचं काम दिलं. मग भ्रष्टाचार हाेणार नाही हे कशावरून? पाेलिसांची ४५ हजार पदे रिक्त असताना ४ हजार जागांची तुटपुंजी भरती केली. राज्यावर २०१४ पर्यंत २ लाख ८५ हजार काेटी कर्ज हाेते. मागील पाच वर्षांत सरकारने २ लाख १५ हजार काेटींचे कर्ज घेतले. मात्र, ते फेडण्यासाठी प्रकल्प उभे केलेेले दिसत नाहीत.

> प्रश्न : राष्ट्रवादीच्या बहुतांश नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आराेप आहेत, त्यामुळे शिवस्वराज्य यात्रेचं नेतृत्व तुमच्याकडे दिलं का? 
डाॅ. काेल्हे : असं नाही. रा‌ष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. आधी आराेप करून दबाव टाकायचा अन‌् मग 
पक्षांतर करायला लावायचा, हा प्लॅन आहे. मागील पाच वर्षांत सत्ता यांच्या हातात हाेती, मग ते एकही आराेप का सिद्ध करू शकले नाहीत?

> प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या भूमिकांमुळे तुम्ही लाेकप्रिय झालात. या महापुरुषांचा राजकारणासाठी वापर हाेताेय का?
डाॅ. काेल्हे : केवळ राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करणे चुकीचेच. त्यांच्या विचारांचा धागा पकडून पुढे चालणे गरजेचे आहे. गडकिल्ल्यांच्या संदर्भात मी आवाज उठवला. मावळ्यांनी दिलेल्या बलिदानाचा अपमान गडकिल्ल्यांच्या संदर्भातील जीआरमुळे झाला. जीआर मागे घेणे आवश्यक हाेते. पण सरकारने निर्णय मागे घेतला नाही. आपल्या येणाऱ्या पिढीला आपण काेणता इतिहास सांगणार आहाेत? 

> प्रश्न : तुमच्या पक्षालाही भगवा झेंडा खुणावतोय?
डाॅ. काेल्हे : भगव्या झेंड्यावर कुणाचीही मक्तेदारी नाही. तरुणांनी ठरवलं आणि ताे झेंडा हातात घेतला, तर त्यात गैर नाही.

> प्रश्न : विराेधकांमध्ये एेक्य दिसत नाही, का? 
डाॅ. काेल्हे : असे नाही. उलट सत्ताधाऱ्यांचे अनेक घाेटाळे विराेधकांनीच समाेर आणले. पण नैतिक जबाबदारी सांभाळून त्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले नाहीत. 

> प्रश्न : राष्ट्रवादीला उतरती कळा लागलेली असताना तुम्ही पक्षात आलात, याकडे कसे बघता? 
डाॅ. काेल्हे : उतरती कळा वगैरे काही नाही. जाणारे जातील पण राष्ट्रवादीच्या विचाराशी असंख्य लाेक जाेडले गेलेत, त्यांचा अनुभव मी शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने घेतला. लाेकांच्या मनातील प्रश्नांना वाचा फाेडण्याचं काम आम्ही करत आहाेत. त्यामुळे आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळताेय.
 

> प्रश्न : ठाकरे व पवारांच्या नेतृत्वात काय फरक जाणवताे?
डाॅ. काेल्हे : उद्धव साहेबांचा सुसंस्कृतपणा आवडताे. पवार साहेबांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे. प्रश्नांना भिडण्याची वृत्ती त्यांच्याकडे आहे. या वयातही ते राज्याचा दाैरा करत आहेत. सांगलीत पूर आल्यानंतर पहिल्यांदा साहेब तिथे गेले. एकाच वेळी संस्कृती, सहकार, राजकारण अन् समाजकारण या सर्व गाेष्टींना पवार व्यापून टाकतात.

बातम्या आणखी आहेत...