आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिथे नेते शेवटपर्यंत निवडणुका लढले, तेथील पक्ष निकालात; शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुखांची भावना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरासमाेर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गणपतराव. - Divya Marathi
घरासमाेर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गणपतराव.

संजीव पिंपरकर

साेलापूर - विधानसभेत तब्बल ५५ वर्षे प्रतिनिधित्व करणारे शेकापचे ज्येष्ठ नेते, आमदार गणपतराव ऊर्फ आबासाहेब देशमुख यांना ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील पितामह’ संबाेधले जाते. ११ वेळा निवडणूक जिंकणाऱ्या ९३ वर्षीय गणपतरावांनी आ​​ता यंदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सांगोला तालुक्यातील कार्यकर्त्यांना मात्र त्यांचा हा निर्णय मान्य नाही. यंदाही गणपतरावांनीच उभे राहावे, असा आग्रह करत राेज अनेक कार्यकर्त्यांच्या झुंडी त्यांच्या घरी येत असतात. पण ते निर्णयावर ठाम आहेत. ‘ज्या नेत्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत नुसत्या निवडणुका लढवल्या तिथले पक्ष निकालात निघाले.  इच्छा आहे की, माझ्यानंतर पुढची २५ वर्षे सांगोला तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहावी,’ अशी भावना ते व्यक्त करतात. सांगोल्यातील निवासस्थानी त्यांच्याशी गप्पा मारत असताना त्याच वेळी दुसरीकडे कार्यकर्त्यांचा मेळावा चालू होता.  
 

> प्रश्न : सर्वच पक्षांतील अनेक नेेते मुलालाच आपला राजकीय वारसदार म्हणून पुढे आणतात. तुम्ही मात्र मागणी असूनही तसं का केलं नाही ?
गणपतराव :  मुलाला तब्येतीचा त्रास आहे. गेल्याच आठवड्यात त्याची प्रकृती बरी नव्हती. शिवाय पैशाची अडचण आहे. निवडणुकीत पैसा लागतो. मुलाची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. पण या दोन अडचणींमुळे त्याची इच्छा असली तरी मी मान्य करू शकलो नाही. ५५ वर्षे आमदार म्हणून काम करताना साहजिकच दुसऱ्या कोणाला संधी मिळाली नव्हती. चार- पाच इच्छुक होते. त्यातल्या एकाची निवड केल्यानं थोडी नाराजी आहे. दोन-चार दिवसांत चर्चेनं ती दूर होईल. 
 

> प्रश्न : ५५ वर्षांच्या आमदारकीनंतर निवडणूक लढवण्यापासून निवृत्ती घेताना काय वाटते ? 

गणपतराव : माझं ९३ वर्षांचं वय. नीट दिसत नाही. नजर नसल्याने लिहिता-वाचता येत नाही. म्हणून चार महिन्यांपूर्वीच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक मतदारसंघात दोनदा बैठक घेऊन कार्यकर्त्यांना निर्णय सांगितला. तरीही त्यांचा अाग्रह चालूच अाहे. आतापर्यंत जे काम केले, विधानसभेत जी भाषणं केली ती आता करू शकणार नाही. विधानसभेत मी सिंचनाचा प्रश्न मांडला होता. २००१ ते २०१० या काळात जलसंपदा खात्यानं २२ हजार कोटी रुपयांचा खर्च केला. त्यातून एक टक्काही सिंचन झाले नाही. हे सरकारी आकडेवारी सांगत होते. तेव्हा रात्र रात्र जागरण करून अभ्यास केला, विधानसभेत भाषण केले होते. त्याची चर्चा खूप झाली. आता ते करता येणार नाही. मग गप्प बसण्यासाठी विधानसभेत जाऊ का? 

> प्रश्न : आता मोकळं झाल्यासारखं वाटतं का?
गणपतराव : मुद्दा समाधानाचा आहे. शरद पवारांनी निर्णय घेतला होता निवडणुकीस उभं राहण्याचा. त्यांनी तो ८० व्या वर्षी बदलला. मी ९३ वर्षांचा आहे. देशात  ९३ व्या वर्षी निवडणूक लढवणारे कुणी असेल तर मला दाखवा. निवडणुकीतून निवृत्त झालाे तरी राजकारणात, समाजकारणात कायम अाहे. कष्टकऱ्यांच्या चळवळीत असेनच. सांगोल्यात पाण्याचा प्रश्न सुटत आला आहे. तीन मोठे प्रकल्प सरकारने मंजूर करून कृष्णा खोरे महामंडळाकडे निधी दिला आहे. त्यावर काम करतच राहीन. यात मी समाधानी आहे. 

> प्रश्न : भाजप-शिवसेनेच्या राजकारणाची सध्याची दिशा, तत्त्वांशी-विचारसरणीशी तडजोड करत होणारं दलबदलूंचं स्वागत पाहताना काय वाटतं? 
गणपतराव : हा त्यांचा प्रश्न आहे. पण आयाराम-गयारामाच्या स्वागताचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पण हे आताच होतंय असं नाही. इंदिरा गांधींनी बांगलादेश स्वतंत्र केला त्या वेळेस काँग्रेसमध्ये अशीच भरती झाली होती. १९७२ च्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे २२२ आमदार होते. त्याच इंदिरा गांधी १९७७ मध्ये पराभूत झाल्या. परिस्थितीत असे बदल होत असतात. 

> प्रश्न : डाव्या पक्षांची, त्यांच्या संस्था-संघटनांची पडझड झाली आहे. त्याची कारणं काय?
गणपतराव : १९९१ पासून खासगीकरणाचा प्रभाव वाढल्यानंतर महाराष्ट्रात मार्क्सवादी विचारावर आधारित चळवळ राबवण्यात डावे पक्ष कमी पडले. ते निवडणुकीत जास्त गुंतले. त्यांचे पुढारीपण शहरातल्या कामगारांपुरतेच मर्यादित राहिले. बदलत्या काळानुसार कार्यपद्धतीत, ध्येयधोरणांत बदल केला नाही. निम्मी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असताना शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. युवकांना आकर्षित करण्यात अपयश आले. कारण डावे विचार अतिशय ठोकळेबाज पद्धतीने मांडले जात होते. शिक्षण पद्धती, बेकारी हे तरुणांचे प्रश्न आहेत. बेकारांचे तांडे बाहेर पडत आहेत. हा बदल कुणी लक्षात घेतला नाही.

> प्रश्न : पवारांवर ईडीने गुन्हा दाखल केलाय?
गणपतराव : ते चुकीचेच आहे. पवार शिखर बँकेचे संचालकही नाहीत. या प्रकरणाची प्रसिद्धी चुकीच्या पद्धतीने झाली. त्यात माध्यमांचाही दोष आहे. शरद पवार, अजित पवार यांच्यावर गुन्हा असेच मथळे झाले. ते बरोबर नाही. हा भ्रष्टाचार नाही,  अनियमितता आहे. तो १०८ कोटींचा आहे, हे अजित पवारांनी विधानसभेत सांगितले होते.
 

दारूचा वास येतोय तोंडाला.. 
आबासाहेबांशी गप्पा चालू असतानाच १०० कार्यकर्त्यांचा जत्था आला. घरासमोर  ते जमले. गप्पा थांबवून ते त्यांना ऐकायला गेले. बोलणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला ते गावनिहाय ओळखत होते. ‘आमच्या पणजोबानं, आजानं, बापानं तुमचं ऐकलं. आता तुम्ही आमचं ऐका, निवडणूक लढवा’ असे एक कार्यकर्ता बोलत होता. आबासाहेब मध्येच म्हणाले, ‘तोंडाला दारूचा वास येतोय.’ तो म्हणाला, ‘मी नाही प्यालो, दुसऱ्याचा वास असेल.’ आबा म्हणाले, ‘अरे, मी तर कुठे प्यालो. फक्त वास येतोय म्हणून सांगितलं...’ बरोबर आहे, असे म्हणत सगळे हसले. तुम्हाला प्रोत्साहन द्यायला तुमच्यातच विरोधकही घुसले असतील, असे म्हणत आबासाहेबांनी अशा एका विरोधकाला हेरलेच. तेव्हा हे सगळे हसत सुटले.
 
 

बातम्या आणखी आहेत...