आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाैकशा टाळण्यासाठी पक्षांतर; जनताच त्यांना धडा शिकवेल; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रमाकांत दाणी 

नागपूर - ‘सरकार पॉप्युलर असल्याचे दावे सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत. ते खरे असेल तर दगड उभा केला तरी निवडून यायला हवा. तुम्ही चांगले काम केले असेल तर तुम्हाला इतर पक्षांतील नेते का हवे आहेत? काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात भाजप वा शिवसेनेत का दाखल करून घेतले जातेय? स्पष्ट सांगायचे तर सत्ताधाऱ्यांमध्येच पुन्हा निवडून येण्याचा आत्मविश्वास नाही. पण, ज्या पद्धतीने लोकांना प्रवेश दिले जाताहेत, त्याबद्दल जनतेच्या मनात प्रचंड चीड निर्माण होतेय. त्यामुळे जनताच यंदा युतीला धडा शिकवेल..’ असा विश्वास काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
 

प्रश्न : लोकसभेतील पराभवानंतर दिल्लीपासून मुंबईपर्यंत काँग्रेसमध्ये मरगळ आलेली दिसते
वडेट्टीवार : हे खरे आहे. सतत होणाऱ्या पराभवामुळे ते स्वाभाविकही आहे. त्यावर आम्ही उपाययोजनादेखील करीत आहोत. पण, अगदी १९७७ सारखी परिस्थिती नाही. मुद्दाम आभास निर्माण करण्यात येत आहे. खोटे बोलणाऱ्यांवर लोक एकदा, दोनदाच विश्वास ठेवतात. शेवटी जनतेलाही हा प्रकार लक्षात येईल. कार्यकर्त्यांमध्ये विश्वास जागवण्याचे, मनोबल वाढवण्याचे प्रयत्न होतच आहेत.

प्रश्न : कमिटेड कार्यकर्तेही दिसत नाहीत?
वडेट्टीवार : आमच्याकडे मीडियाचे लक्ष नाही. दिल्लीतील मोठमोठी आंदोलनेही माध्यमांमध्ये आली नाहीत. पवारांचा अलीकडचा सोलापूरचा कार्यक्रम किती चॅनल्सनी दाखवला? 

प्रश्न : विदर्भात काँग्रेसकडून अजूनही एखादे मोठे आंदोलन दिसले नाही?
वडेट्टीवार : आंदोलने नक्कीच झाली. जनाक्रोश मोर्चाला लाखो लोक आले. पण माध्यमांनी साथ दिली नाही.

प्रश्न : म्हणजे तुमचा पक्ष प्रसारमाध्यमांवर अवलंबून आहे असे समजावे का?
वडेट्टीवार : जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाेहाेचायचे असेल तर ते माध्यमांतूनच शक्य आहे. देशातच हुकूमशाही सुरू आहे. सारेच दबावात आहेत. 

प्रश्न : काँग्रेस संकटात असताना आजही पक्षात गटबाजी सुरूच आहे? 
वडेट्टीवार : काही प्रमाणात हे खरे आहे. तिकीट मागण्यासाठी स्पर्धा आहे. त्याला गटबाजी म्हणता येणार नाही. निकोप स्पर्धा आहे. पक्षात प्रगल्भ लोकशाही असल्याचे हे लक्षण आहे.

प्रश्न : नेते पक्ष सोडून का जाताहेत?
वडेट्टीवार : काही नेते दबावापोटी, चौकशीचा धाक दाखवल्याने जात आहेत. काहींना त्यांची कारखानदारी वाचवायची आहे. 
 

प्रश्न : पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना भवितव्य दिसत नाही, हे खरे आहे का?
वडेट्टीवार : ही नेतेमंडळी इतकी वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राहिली. अनेक वर्षे आमदार, मंत्री राहिली. आता ते विकासाची कारणे देत आहेत. आतापर्यंत या लोकांनी काय झक मारली?.. तकलादू कारण आहे हे. लोकांवर तुमची पकड नाही. लोक विरोधात गेले म्हणूनच तुम्ही पक्ष बदलत आहात. गडकरी म्हणतात त्याप्रमाणे पक्षांतर करणारे उंदीरच आहेत. एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर उड्या मारणारे..

प्रश्न : पण त्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा हाेईल का?
वडेट्टीवार : मुळीच नाही. जनता या नेत्यांसोबत जाणार नाही. भाजपमध्ये अनेक वर्षे निष्ठेने काम करणाऱ्यांचे काय? त्यांना कधी संधी मिळणार? तेथे असंतोष निर्माण होणारच ना. त्यामुळे आश्चर्यकारक निकाल लागतील. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार येईल.

प्रश्न : यंदा काय शक्यता दिसते आघाडीची?
वडेट्टीवार : चांगल्या यशाची अपेक्षा आहे. मागील वेळी एकत्र लढलो असतो तर आमच्या १३७ जागा आल्या असत्या. पण दोघांचेही नुकसान झाले. आता या वेळी आघाडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. 

प्रश्न : सत्ताधाऱ्यांचा प्रचारही सुरू झालाय?
वडेट्टीवार : त्यांच्याकडे बोलायला काही नाही. म्हणून ते राममंदिरावर बोलतात. पाकिस्तानचा िवषय मांडतात. कलम ३७० वर देशभक्तीचे दावे मांडतात. राष्ट्रीय मुद्दे राज्याच्या निवडणुकीत कसे? राज्यात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. नागपुरात गुन्हे वाढले.  त्यावर ते बोलत नाहीत.

प्रश्न : विरोधी पक्षांनी अनेक मंत्र्यांवर आरोप केलेत, पण काहीच साध्य झाले नाही?
वडेट्टीवार : सरकारकडून चौकशीच होत नाही. चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून व्हायला हवी. सरकारच मंत्र्यांना क्लीन चिट देते. गृहनिर्माणमंत्र्यांना काढले, कारण त्यात मुख्यमंत्री स्वत: अडचणीत येणार होते म्हणून.


प्रश्न : विरोधकांना  या प्रश्नावर सरकारविराेधात न्यायालयांचा दरवाजा ठोठावता आला अस
ता?
वडेट्टीवार : सरकारच्या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात गेलो तरी बऱ्याच प्रकरणांमध्ये न्यायाची अपेक्षा पूर्ण होत नाही.

प्रश्न : न्यायव्यवस्थेकडूनही तुम्हाला न्याय मिळत नाही, असे म्हणायचेय?
वडेट्टीवार : मला बोलताना मर्यादा येतात. सरकारच्या निर्णयाविराेधात न्यायव्यवस्थेकडून जी अपेक्षा आहे, तिथे आता आम्हीच कमी पडलो, असे मी म्हणेन. मला आरोप करायचे नाहीत. फार काही बोलता येत नाही. अघोषित हुकूमशाही सुरू आहे.

प्रश्न : तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
वडेट्टीवार : आम्ही आघाडी म्हणून लढत आहोत, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवून नाही. पूर्वी फडणवीस किंवा हरियाणाचे खट्टर तरी कुठे उमेदवार होते? आम्ही कुठलाही चेहरा घेऊन निवडणुकीत उतरणार नाही. सरकारचे अपयश, चुका, फसवणूक जनतेपुढे मांडणार.
 

प्रश्न : तुमचे प्रचाराचे मुद्दे काय आहेत?
वडेट्टीवार : सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले. नवे उद्योग नाहीत. ५२ % उद्योग बंद पडले आहेत. बेरोजगारीने कळस गाठलाय. शेतकऱ्यांना कर्जमाफी  दिली नाही. सिंचनाच्या क्षेत्रात काम झाले नाही. प्रत्येक खात्यात बजेटमध्ये दाखवलेला निधीही सरकारकडून खर्च झाला नाही. मग पैसा गेला कुठे? मंत्र्यांकडून भ्रष्टाचार झाला. कोणाचीही चौकशी झाली नाही. आमच्या जाहीरनाम्यात आम्ही हे महत्त्वाचे मुद्दे घेणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...