आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्यगृहात मोबाइल वापराबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला होता, याबाबत अभिनेता सुबोध भावे यांच्याशी साधलेला संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अभिनय हा माझा जीव की प्राण आहे आणि नाटकाशिवाय मी जगणे अशक्य आहे. नाटकाच्या प्रयोगादरम्यान सातत्याने मोबाइल वाजण्याच्या घटनेने त्रस्त होऊन मी नाटकांत अभिनय करणे सोडून देण्याची भूमिका मांडली. मुळात ती माझी उद्विग्नता असून नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांनी ती समजून घ्यावी. नाट्यगृहात कलेप्रति आदर बाळगून आनंद घ्यावा. उगाच व्यत्यय आणून त्याचा अपमान नको, अशी माफक अपेक्षा असल्याची भावना सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केली आहे. एका नाटकाच्या प्रयोगादरम्यान प्रेक्षकांचे मोबाइल सातत्याने वाजत असल्याने त्रस्त झाल्याने सुबोधने नाट्य अभिनयालाच रामराम ठोकण्याची पोस्ट दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टाकली होती. त्यामुळे नाट्यगृहात मोबाइल वापराबाबतचा मुद्दा ऐरणीवर आला होता. याबाबत सुबोध भावेशी साधलेला हा संवाद..

 

> प्रयोगादरम्यान नेमके काय घडले?
सुबोध : ही एका प्रयोगावेळची घटना नाही. अनेक नाटकांच्या प्रयोगावेळी प्रेक्षकांचा मोबाइल मध्येच वाजतो. त्यामुळे केवळ कलाकारांनाच नव्हे, तर दर्दी रसिकांनाही नाटकाचा आस्वाद घेता येत नाही. “प्रयोगावेळी मोबाइल बंद किंवा सायलेंट करून ठेवा,’ असे आवाहन करूनही काही प्रेक्षक ते टाळतात. कालच्या प्रयोगानंतर माझा याबाबतचा संयम सुटला. मी पडद्याबाहेर येऊन प्रेक्षकांना याबाबत बोललो, परंतु तरीही समाधान न झाल्याने अखेर उद्विग्नतेतून मला सोशल मीडियावरून संताप व्यक्त करावा लागला. 


> तू नाटक सोडणे हा तोडगा आहे का?
सुबोध : मुळातच नाही..आणि ही गोष्ट मला पोस्ट केल्यानंतर अधिकच प्रकर्षाने जाणवू लागली. काही प्रेक्षकांच्या कृत्याने उद्विग्न होऊन मी नाटकांपासून दूर जाणे हा यावर कधीच तोडगा असू शकणार नाही. मात्र, प्रेक्षकांनी यामागची व्यथा लक्षात घ्यावी हे महत्त्वाचे आहे. मुळात नाटकांतील व्यत्यय कलाकारांसाठीच त्रासदायक नसतात. प्रेक्षकांनाही ते भोगावे लागते. नाटकाच्या प्रयोगावेळी कलाकार, तंत्रज्ञासोबतच नाट्यगृहात उपस्थित असलेला प्रत्येक घटक हा त्या नाटकाचा भाग असतो. आम्ही प्रचंड कोलाहलातही आमचा अभिनय सादर करू शकतो. परंतु इतके पैसे मोजून नाट्यगृहात आलेल्या दर्दी प्रेक्षकांना अशा व्यत्ययामुळे कलाकृतीचा आस्वाद घेता येत नसेल तर बाब अत्यंत गंभीर आहे. 


> अशा व्यत्ययावर उपाय काय?
सुबोध : प्रयोगावेळी जॅमर लावणे, प्रेक्षकांचे खिसे तपासणे हा मला मुळीच उपाय वाटत नाही. विदेशात नाट्यरसिक कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी येताना प्रत्येक सूचना स्वत:हून पाळतात. तशा आपल्याकडेही स्वमताने पाळल्या जाव्यात असे मला वाटते. आता मी पुढील काही प्रयोगाच्या सुरुवातीलाच दारावर उभा राहून माझ्यासमोर प्रेक्षकांना मोबाइल बंद किंवा सायलेंट करायला लावणार आहे. त्यातून जनजागृती होईल असे मला वाटते. 

 

सुबोधने सोशल मीडियावरुन व्यक्त केली होती प्रेक्षकांच्या वागणुकीबद्दल खदखद
“अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोनच्या मध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल,’ अशी पोस्ट सुबोधने सोशल मीडियावर टाकली होती. 

बातम्या आणखी आहेत...