आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपूरमध्ये ईडीकडून रॉबर्ट वढेरा यांची चौकशी; 9 तासांत विचारले 20 प्रश्न 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- बिकानेर जमीन खरेदी प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वढेरा आणि त्यांची सासू मॉरिन यांची ईडीने मंगळवारी चौकशी केली. प्रियंका आपल्या सासू व वढेरा यांच्यासह हॉटेलमधून ईडी कार्यालयात पोहोचल्या व नंतर लखनऊला परतल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम वढेरा यांच्या आईला पावणेदोन तासांत १० प्रश्न विचारले. त्यानंतर त्यांना परत पाठवले. वढेरा यांच्याशी सकाळी १० वाजून २५ मिनिटांपासून प्रश्नोत्तरांची मालिका सुरू झाली. दुपारच्या जेवणानंतर दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पुन्हा चौकशी सुरू झाली. 

 

ईडीकडे जवळपास ५० प्रश्नांची यादी होती. या नऊ तासांत वढेरा यांना बिकानेरमध्ये जमीन का खरेदी केली, कोणी व्यवहार केला यासारखे २० प्रश्न विचारण्यात आले. वढेरा यांना बुधवारी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान, वढेरा यांनी सांगितले की, त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीच नाही. कितीही वेळा चौकशी केली तरी सहन करू. ईडीसमोर वढेरा यांची जयपूर येथे प्रथमच चौकशी झाली. यापूर्वी लंडनमधील मालमत्ताप्रकरणी त्यांची दिल्ली येथे ईडीने तीन वेळा चौकशी केली आहे. 


ईडीने तयार केली ५० प्रश्नांची यादी 
वढेरांची जमिनीपासून विदेशातील खात्यांपर्यंत चौकशी 

- जमीन खरेदीसाठीच्या पैशाचा स्रोत काय होता? 
- तुमच्या कंपनीने स्वस्तात जमीन घेऊन महागात विकली. तुमच्या सांगण्यावरून हे झाले? तुमच्या कंपनीने या जमिनीचा काय उपयोग केला? 
- २०१४ मध्ये कोलायतमधील जमीन खरेदीचे बोगस वाटप झाले. ही माहिती कंपनीच्या अधिकृत व्यक्तीने तुम्हाला कधी दिली? 
- जमीन घेताना किती पैसे रोख आणि किती चेकने दिले. 
- तुमच्या कंपनीची खाती विदेशातही आहेत? 

 

वढेरांचे ट्विट : ७५ वर्षीय आईलाही त्रास देत आहेत 
- या चौकशीपूर्वी वढेरांनी आईसोबतचे एक छायाचित्र ट्विट करून माझ्या ७५ वर्षीय आईलाही त्रास दिला जात आहे, असे म्हटले आहे. 


७९ लाखांत घेतलेली जमीन ५ कोटींना विकली 
वढेरांनी बिकानेरमध्ये ७९ लाखांत घेतलेली जमीन ३ वर्षांनी ५.१५ कोटींत विकली. ईडीने समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नाहीत. कोर्टाने निर्देश दिल्यावरच हजर झाले, असे आरोप आहेत. वढेरांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी कंपनीत त्यांची आई संचालिका होती. 
 

बातम्या आणखी आहेत...