Home | Sports | From The Field | IPL 2019 24th match mi vs kxip mumbai win

पोलार्डच्या झंझावाताने मुंबई इंडियन्सचा विजय, पंजाबच्या लोकेश राहुलचे शतक ठरले व्यर्थ 

वृत्तसंस्था | Update - Apr 11, 2019, 08:50 AM IST

आयपीएल-12 : किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा अखेरच्या चेंडूवर तीन गड्यांनी पराभव; ख्रिस गेलचे अर्धशतक

 • IPL 2019 24th match mi vs kxip mumbai win

  मुंबई - कर्णधार केरॉन पोलार्डच्या (८३) अर्धशतकाच्या जोरावर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर बुधवारी आयपीएलच्या १२ व्या सत्रात ३ गडी राखून विजय मिळवला. सामना गाजवणारा केरॉन पोलार्ड सामनावीर ठरला. किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत ४ बाद १९७ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाने २० षटकांत ७ बाद १९८ धावा केल्या. सलामीवीर डी. कॉकने २३ चेंडूत २ चौकारांसह २४ धावा केल्या.


  दुसरा सलामीवीर सिद्धेश लाडने १३ चेंडूत १ चौकार व एक षटकार खेचत १५ काढल्या. सूर्यकुमारने १५ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २१ धावा केल्या.किशनला कुरनने ७ धावांवर धावबाद केले. अष्टपैलू हार्दिक पांड्याने १३ चेंडूत २ चौकारांसह १९ धावा जोडल्या. केरॉन पोलार्डने एकाकी लढत देत कर्णधाराला साजेशी खेळी करत अर्धशतक झळकावले. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि १० षटकार खेचत ८३ धावा ठाेकल्या. पंजाबच्या मो. शमीने २१ धावा देत ३ बळी घेतले. अश्विन व कुरनने प्रत्येकी एक विकेट घेतली.


  लोकेश राहुलचे आयपीएलमधील पहिले शतक
  राहुलने आयपीएल करिअरमधील पहिले शतक झळकावले. यापूर्वी त्याची ९५* धावांची सर्वोच्च खेळी होती. आता त्याचे शतक झाले. या स्फोटक खेळीमुळे त्याने विश्वचषकासाठी आपली दावेदारी मजबूत केली. राहुलने १९ व्या षटकांत हार्दिकच्या चेंडूवर ३ षटकार व १ चौकारांसह २५ धावा वसुल केल्या. त्याने ४ षटकांत ५७ धावा दिल्या. हे आयपीएलमधील दुसरे महागडे षटक ठरले.


  पंजाबच्या लोकेश राहुलचे शतक ठरले व्यर्थ
  प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २० षटकांत ४ बाद १९७ धावांचा डोंगर उभारला. लाेकेश राहुलने शानदार शतक झळकावले. त्याने ६४ चेंडूत ६ उत्तुंग षटकार व ६ चौकारांसह नाबाद १०० धावा ठोकल्या. त्याचे शतक व्यर्थ ठरले. ख्रिस गेलने ३६ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. गेल व राहुल जोडीने पहिल्या गड्यासाठी ७७ चेंडूंत ११६ धावांची शतकी भागीदारी रचली. डेव्हिड मिलर (७), नायर (५), कुरन (८) व मनदीप सिंग (७*) मोठी खेळी करू शकले नाहीत. मुंबईच्या हार्दिक पांड्याने ५७ धावांत २ विकेट घेतल्या. बेहेरनड्रॉप, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Trending