IPL : ऋषभच्या झंझावाताने दिल्ली विजयी; सात वर्षांनंतरचे रहाणेचे शतक व्यर्थ

दिल्ली कॅपिटल्सची 6 गड्यांनी यजमान राजस्थान संघावर मात

 वृत्तसंस्था

Apr 23,2019 09:03:00 AM IST

जयपूर - ऋषभ पंत (नाबाद ७८) आणि शिखर धवनच्या (५४) झंझावाती खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्स संघाने साेमवारी आयपीएलमध्ये सातवा विजय संपादन केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीच्या टीमने आपल्या ११ व्या सामन्यात यजमान राजस्थान राॅयल्सचा पराभव केला. दिल्लीने १९.२ षटकांत ६ गड्यांनी सामना जिंकला. या सातव्या विजयाच्या बळावर दिल्ली संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. राजस्थानच्या रहाणेने (१०५) ७ वर्षंनंतर शतक ठाेकले. मात्र, त्याला पराभव टाळता आला नाही.


राजस्थान संघाने घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १९१ धावा काढल्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघाने ४ गड्यांच्या माेबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. पृथ्वीने संघाच्या विजयात ४२ धावांचे महत्त्वाचे याेगदान दिले.


ऋषभचे नववे अर्धशतक : दिल्ली कॅपिटल्सचा प्रतिभावंत फलंदाज ऋषभ पंतने नाबाद ७८ धावा काढल्या. त्याने ३६ चेंडूंचा सामना करताना ६ चाैकार आणि ४ षटकारांच्या आधारे ही खेळी केली. यासह त्याने आपल्या आयपीएल करिअरमधील नववे अर्धशतक साजरे केले. तसेच त्याने शिखर धवनसाेबत अर्धशतकी भागीदारी केली.


चेन्नईला आज प्ले-आॅफची संधी
चॅम्पियन चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आता १२ व्या सत्राच्या आयपीएलच्या प्ले-आॅफमधील आपला प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे. यासाठी यजमान चेन्नईचा संघ आज मंगळवारी सनरायझर्स हैदराबादच्या आव्हानाला सामाेरे जाणार आहे. काेहलीच्या बंगळुरू संघाने गत सामन्यात चेन्नईचा पराभव केला. आता फायनल हैदराबादमध्ये : यंदा १२ व्या सत्रातील आयपीएलचा फायनल मुकाबला १२ मे राेजी आता हैदराबादच्या मैदानावर आयाेजित केला जाईल. यापूर्वी चेन्नई येथे आयाेजनाचा निर्णय घेण्यात आला हाेता. मात्र, या ठिकाणी तामिळनाडू राज्य शासनाने तीन बंद स्टँड आेपन करण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

X
COMMENT